शिंदे गटाच्या आमदारांनी खासदारांनी ५० खोके घेतलेत, राणांनी माघार घेतल्यानंतर पटोलेंचा निशाणा
राज्यात राजकीय गोंधळा दरम्यान शिंदे समर्थक आमदार बच्चू कडू आणि भाजप समर्थक आमदार रवी राणा यांच्यामध्ये मागील काही दिवसात जोरदार शाब्दिक युद्ध रंगले होते. हा वाद शाब्दिक न राहता स्वाभिमानाचा ठरला होता. प्रहार अध्यक्ष बच्चू कडू यांनी शिंदे- फडणवीस सरकारला दिलेल्या इशाऱ्यानंतर हा वाद चांगलाच चर्चेत आला. मात्र, आता रवी राणा यांनी माघार येत दिलगिरी व्यक्त केली आहे. त्यावरच आता काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
काय म्हणाले नाना पटोले?
रवी राणा आणि बच्चू कडू यांच्या वादावर बोलताना पटोले म्हणाले की, शिंदे गटाच्या आमदारांनी खासदारांनी ५० खोके घेतलेत, हे त्यांचेच आमदार मान्य करतात. त्यामुळे खोके वाचवण्यासाठी त्यांना सुरक्षा दिली पाहिजे. विरोधकांचे रक्षण करायला जनता सक्षम आहे, आमच्याबरोबर जनता आहे. पण त्यांनी घेतलेले खोके वाचवायला त्यांना सुरक्षा व्यवस्था दिली जाते, असा गंभीर आरोप नाना पटोले यांनी यावेळी प्रतिक्रिया देताना केला.
पुढे बोलताना त्यांनी मुंबई महापालिकेतील भ्रष्टाचाराची चौकशी कॅगमार्फत होणार यावर बोलताना ते म्हणाले की, तुमच्या भ्रष्टाचाराची चौकशी कोण करणार? तुम्ही ज्या पद्धतीने लोकांना खाऊ देणार नाही, असे म्हणता, मात्र स्वतःच भ्रष्टाचार करता आहेत, त्याची चौकशी कोण करणार?
सोबतच त्यांनी गुजरात मध्ये घडलेल्या दुर्घटनेवर बोलताना नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला. ते म्हणाले, गुजरातमध्ये पूल पडला त्यात , ४०० लोकांचा मृत्यू झालाय, असा अंदाज आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी बंगालमध्ये होते, तेथेही पूल पडला. हे अॅक्ट ऑफ गॉड नसून फ्रॉड आहे. तेच गुजरातमध्येही लागू होतं. आगामी गुजरात विधानसभा निवडणुकीत याचे परिणाम दिसून येतील. असे विधान दुर्घटनेवर बोलताना त्यांनी यावेळी केले.