ठाकरे गटाच्या अडचणी थांबेना! शिवसेना भवनाविरोधात तक्रार दाखल
राज्यात सध्या प्रचंड राजकीय गोंधळ सुरु आहे. त्यातच दुसरीकडे नुकताच निवडणूक आयोगाने शिवसेना नाव आणि पक्ष चिन्ह हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाला दिले. त्यामुळे उद्धव ठाकरे यांच्या गटाला मोठा धक्का बसला आहे. त्यातच शिवसेना भवनावर शिंदे गट दावा करणार का? असा प्रश्न निर्माण झाला होता. हे सर्व सुरू असताना आता ठाकरे गटाच्या अडचणीत पुन्हा एकदा वाढ करणारी बातमीसमोर आली आहे. सामाजिक कार्यकर्ते योगेश देशपांडे यांनी शिवाई ट्रस्ट आणि शिवसेना भवनाविरोधात धर्मादाय आयुक्तांकडे तक्रार दाखल केली आहे. त्यामुळे ठाकरे गटाची डोकीदु:खी वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
काय म्हणाले तक्रारदार?
सामाजिक कार्यकर्ते योगेश देशपांडे यांनी शिवसेना भवनाविरोधात धर्मादाय आयुक्तांकडे तक्रार केली आहे. एखाद्या ट्रस्टची जागा शिवसेना भवनाला कशी दिली? असा सवाल त्यांनी या तक्रारीत उपस्थित केला आहे. सोबतच त्यांनी शिवाई ट्रस्टच्या विरोधात देखील तक्रार दिली आहे. त्यानंतर लोकशाही मराठीशी बोलताना त्यांनी महत्वाची माहिती दिली आहे. ते म्हणाले की, बातम्यांमधून समोर आले की, शिवसेना भवन ही शिवाई ट्रस्टची संपत्ती आहे. या संदर्भात अधिक माहिती घेतली असता समोर आले की, शिवाई ट्रस्ट ही पब्लिक ट्रस्ट आहे. त्यामुळे या पब्लिक ट्रस्ट ने कुठल्या कायद्याखाली एखाद्या राजकीय पक्षाला जागा दिली? ते पण एवढ्या वर्ष, पब्लिक ट्रस्ट असल्यामुळे ही जागा विकताही येत नाही आणि भाड्यांनी देखील देता येत नाही. त्यामुळे हे बेकायदेशीर कृत आहे. त्यामुळे ही तक्रार केली आहे.
आधी का नाही केली तक्रार?
माझ्यासारख्या कित्येक जणांना माहित नव्हतं ही पब्लिक ट्रस्टची जागा आहे. हा विषय आता समोर आला आहे. त्यामुळे आता सर्वांना माहित झालं की शिवसेनाची ही जागा नाहीये त्यामुळे याची माहिती घेऊन मी तक्रार केली.