शिवसेनेने काय कमवले सांगत महाविकास आघाडीने शेअर केला 'त्या' आजींचा फोटो
मुंबई : महाराष्ट्रातील राजकीय सत्तासंघर्षाचा आज दहावा दिवस असून हे आता अंतिम टप्प्यात आले आहे. एकनाथ शिंदे यांनी बंड केलं आणि राज्यातील सत्तासंघर्षाची सुरुवात झाली. शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री पदाचा त्याग केला आणि गेल्या अडीच वर्षांपासून महाराष्ट्रात सत्तेत असलेलं महाविकास आघाडी सरकार कोसळले. यानंतर विविध प्रतिक्रिया समाजातून उमटत आहेत. कुठे आनंद तर कुठे दुःख व्यक्त करण्यात येत आहेत. अशात एका आजींचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्या पत्रानंतर आज विशेष अधिवेशनात बहुमत चाचणी होणार होती. परंतु, त्याआधीच आपल्याच लोकांनी घात केला असे म्हणत उध्दव ठाकरे यांनी अनपेक्षितपणे मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला. आणि रात्रीत महाविकास आघाडी सरकार कोसळले. यामुळे शिवसैनिक भावूक झाले आहेत. अशातच सोशल मीडियावर एका आजींचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या फोटोमध्ये आजी टीव्हीसमोर हात जोडून उभी असून चेहऱ्यावरील वेदना स्पष्ट जाणवत आहेत. हा फोटो आता व्हायरल झाला असून महाविकास आघाडीच्या अधिकृत पेजने शेअर केला आहे. सोबतच हे शिवसेने कमावला आहे. बाकी कोठे नाही भेटणार पहिला हे चित्र, अशी कॅप्शन दिली आहे.
दरम्यान, ठाकरे सरकारला बहुमत चाचणीला सामोरं जावं लागणार हे सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी फेसबुक लाईव्हद्वारे जनतेशी संवाद साधला. यावेळी मनातील खंत व्यक्त करत महाविकास आघाडीतील सहकारी शरद पवार व सोनिया गांधी तसेच सरकारमधील सर्व सहकाऱ्यांचे त्यांनी आभार मानले. यानंतर आता भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांचे सरकार सत्तेत येणार असून त्यांच्याशी चर्चा करण्यासाठी एकनाथ शिंदे गोव्याहून मुंबईकडे रवाना झाले आहेत. अशातच, फडणवीस सरकारचा शपथविधी 1 जुलै रोजी होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.