समोर या, चर्चा करू व मार्ग काढू; मुख्यमंत्र्यांचे पुन्हा बंडखोरांना आवाहन

समोर या, चर्चा करू व मार्ग काढू; मुख्यमंत्र्यांचे पुन्हा बंडखोरांना आवाहन

शिंदे गट काय भूमिका घेणार, याकडे सर्वांचेच लक्ष
Published on

मुंबई : मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी आवाहन करुनही एकनाथ शिंदे व बंडखोरांनी परतले नाही. अखेर उध्दव ठाकरेंनी कडक भूमिका घेत कारवाई केली असून बंडखोरांवर टीकादेखील केली. तर दुसरीकडे, एकनाथ शिंदे गटाने बंडखोरी केली असली तरीही आम्ही शिवसेनेतच असल्याचे सांगितले आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी पुन्हा एक पाऊल मागे घेत समोर या. बसून चर्चा करू व मार्ग काढू. कोणत्याही भूलथापांना बळी पडू नका, असे आवाहन केले आहे.

उध्दव ठाकरे म्हणाले की, आपण गेल्या काही दिवसांपासून गुवाहाटी येथे अडकून पडलेले आहात. आपल्या बाबत रोज नवीन माहिती समोर येत आहे. आपल्यातील बरेच संपर्कातही आहेत. आपण आजही मनाने शिवसेनेत आहात. आपल्यापैकी काही आमदारांच्या कुटुंबातील सदस्यांनी देखील संपर्क साधून आपल्या मनातील भावना मला कळवल्या आहेत. आपल्या भावनांचा मी शिवसेनेचा कुटुंबप्रमुख म्हणून आदर करतो. कुटुंबप्रमुख म्हणून तुम्हाला मनापासून सांगतो अजूनही वेळ गेलेली नाही.

माझं आपल्याला सगळ्यांना आवाहन आहे. आपण या माझ्या समोर बसा, शिवसैनिकांच्या आणि जनतेच्या मनातील संभ्रम दूर करा यातून निश्चित मार्ग निघेल. आपण एकत्र बसून यातून मार्ग काढू. कोणाच्याही कोणत्याही भूलथापांना बळी पडू नका. शिवसेनेने जो मान-सन्मान तुम्हाला दिला तो कुठेही मिळू शकत नाही. समोर आलात बोललात तर मार्ग निघेल. शिवसेना पक्ष प्रमुख आणि कुटुंब प्रमुख म्हणून आजही मला तुमची काळजी वाटत आहे. समोर येऊन बोला आपण मार्ग काढू, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले आहे.

समोर या, चर्चा करू व मार्ग काढू; मुख्यमंत्र्यांचे पुन्हा बंडखोरांना आवाहन
दि.बा. पाटलांच्या नावाला माझा विरोध नव्हताच, जे नाव दिले ते शिंदेंनीच; मुख्यमंत्र्यांचा गौप्यस्फोट

दरम्यान, शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीला आठ दिवस झाले आहेत. एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर राज्यातील महाविकास आघाडी सरकार आणि शिवसेनेला मोठे हादरे बसले आहेत. मुख्यमंत्र्यांनी वारंवार आवाहन करुनही शिंदे गट भाजपसोबत युती करण्यावर कायम आहे. आता पुन्हा एकदा मुख्यमंत्र्यांनी बंडखोर आमदारांना आवाहन केले असून शिंदे गट काय प्रतिक्रिया देणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com