ठाकरे-आंबेडकर पाठोपाठ शिंदे-आंबेडकर युती? चैत्यभूमीवर मुख्यमंत्री शिंदे आणि आनंदराज आंबेडकर एकत्र
राज्यात सध्या प्रचंड राजकीय गोंधळ सुरु आहे. अशातच राजकीय समीकरण एकदम उलट- सुलट होताना दिसत आहे. त्यातच शिवसेना ठाकरे गट प्रमुख उद्धव ठाकरेंनी नुकताच शिवशक्ती- भीमशक्ती एकत्र येणार असा नारा दिल्यानंतर. वंचित बहुजन आघाडी आणि शिवसेना ठाकरे गट एकत्र येणार हे आता जवळपास निश्चित झाले आहे. वंचितने युतीसाठी शिवसेनेला होकार दिला आहे. त्याच पार्श्वभूमीवर आज पुन्हा एक राजकीय समीकरण घडतंय की काय असे चित्र निर्माण झाले आहे. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि रिपब्लिकन सेनेचे अध्यक्ष आनंदराज आंबेडकर एकत्र दिसून आले आहे. त्यामुळे रिपब्लिकन सेना आणि शिंदे गट एकत्र येणार का असा प्रश्न निर्माण झाला आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा ६ डिसेंबर रोजी महापरिनिर्वाण दिन आहे. त्या पार्श्वभूमीवर आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि रिपब्लिकन सेनेचे अध्यक्ष आनंदराज आंबेडकर यांनी चैत्यभूमीवर नियोजनाची पाहणी केली. या दोन्ही नेत्यांनी एकत्र भेटीने राजकीय वर्तुळात वेगवेगळे तर्क- वितर्क लावण्यात येत आहे. दरम्यान, या दोन्ही नेत्यांनी अद्यापही याबाबत कुठलेही भाष्य केले नाही.
मात्र, या आधी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी स्थापन केलेल्या बौधजन पंचायत समिती, मुंबई येथे काल १ डिसेंबर रोजी आनंदराज आंबेडकर यांनी शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांची सदिच्छा भेट घेतली होती. त्यामुळे मुख्यमंत्री शिंदे आणि आनंदराज आंबेडकर यांच्यात आज झालेली भेट निव्वळ योगायोगा होता की दुसरे काही याबाबत शंका निर्माण करण्यात येत आहे. त्यामुळे राज्यात ठाकरे- आंबेडकर युती नंतर शिंदे- आंबेडकर युती होणार का? अशी चर्चा सुरु झाली आहे.