माझ्यासारख्या सर्वसामान्य घरातील व्यक्ती सत्तेच्या सर्वोच्च स्थानी बसली हे बाबासाहेबांनी दिलेल्या संविधानामुळेच- मुख्यमंत्री शिंदे
आज भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर 66 वा महापरिनिर्वाणदिन आहे. चैत्यभूमीवर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना वंदन करण्यासाठी राज्यभरातून अनुयायी येत आहे. त्यातच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीदेखील चैत्यभूमीवर जात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना वंदन केले. त्यांच्यासोबत राज्यपाल भगतसिंग कोश्यारी हे देखील उपस्थित होते. अभिवादन केल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी फेसबुक पोस्ट करत प्रतिक्रिया दिली आहे.
काय म्हणाले एकनाथ शिंदे?
आज महापरिनिर्वाण दिनामित्त मी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना विनम्र अभिवादन करतो. आज आपण केवळ बाबासाहेब आंबेडकर यांच्यामुळेच जगामध्ये ताठ मानेने उभे आहोत. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या घटनेमुळे सर्वसामान्यांना अधिकार प्राप्त झाले. त्यांना जगण्याचा हक्क मिळाला. माझ्यासारख्या सर्वसामान्य घरातील व्यक्ती सत्तेच्या सर्वोच्च स्थानी बसली हे बाबासाहेबांनी दिलेल्या संविधानामुळेच शक्य झाले असल्याचे यावेळी बोलताना सांगितले. बहुजनांच्या मनात आत्मविश्वास निर्माण करण्याचे काम बाबासाहेबांनी केले. दादर येथील इंदू मिलच्या जागेत अतिभव्य असे स्मारक उभारण्याचे काम प्रगतीपथावर असून हे सरकार ते नक्की पूर्ण करेल असे यावेळी बोलताना स्पष्ट केले. तसेच समाजातील तरुणांना शासकीय वसतिगृह, बार्टीच्या माध्यमातून देण्यात येणाऱ्या सुविधा, परदेशी शिक्षणासाठी शिष्यवृत्ती, स्टॅण्ड अप इंडियाच्या माध्यमातून मिळणाऱ्या सवलती यात नक्की वाढ करण्यात येईल असेही याप्रसंगी बोलताना स्पष्ट केले.