मुख्यमंत्री शिंदे आणि राज ठाकरेंमध्ये तब्बल पाऊण तास चर्चा, भेटीनंतर शिंदे म्हणाले...
राज्यात कालपासून गणेशोत्सव सुरु झाला आहे. परंतु राजकीय नेते एकमेकांच्या घरी गणेशाच्या दर्शनासाठी जात आहेत. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे देखील अनेक महत्वाचा ठिकाणी हजेरी लावताना दिसत आहे. आज सकाळीच त्यांनी उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या निवासस्थानी मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांनी गणेश दर्शन घेतले. त्यानंतर लगेच मुख्यमंत्री शिंदे हे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ या निवासस्थानी गणेश दर्शनासाठी पोहचले. या भेटीमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यात सुमारे पाऊण तास चर्चा झाल्याची माहिती आहे.
भेटीनंतर काय म्हणाले मुख्यमंत्री ?
राज ठाकरे यांच्या भेटीनंतर माध्यमांशी बोलत असताना शिंदे म्हणाले की, राज्यात गणेशोत्सवामुळे आनदाचं वातावरण आहे. गणेशोत्सवानिमित्ताने नेहमी एक-दुसऱ्यांकडे जात असतो. आज राज ठाकरे साहेबांच्या घरी आलो, गणेशाचे दर्शन घेतले. ही सदिच्छा भेट होती. ऑपरेशन झाल्यानंतर येणार होतो. त्यांच्या प्रकृतीची चौकशी करण्यासाठी आणि गणरायाच्या दर्शनासाठी ही भेट असल्याचे त्यांनी सांगितले. या भेटीत राजकीय चर्चाच झाली नाही, ही केवळ सदिच्छा भेट होती.असे एकनाथ शिंदे यांनी स्पष्टपणे सांगितले.
भेटीत धर्मवीर आनंद दिघे साहेबांच्या आठवणी
पुढे शिंदेंनी माध्यमांच्या प्रश्नावर भेटी दरम्यान काय चर्चा झाली हे सांगितले. त्यावेळी ते म्हणाले की, या भेटीत धर्मवीर आनंद दिघे साहेबांच्या आठवणी चर्चेत निघाल्या.
जुन्या आठवणींना उजाळा मिळाला असल्याचेही सांगितले. राज ठाकरे आणि आपण बाळासाहेब ठाकरेंच्या सानिध्यात काम केलेले आहे. राज यांनीही त्यावेळी शिवसेनेत काम केले होते, असे मुख्यमंत्री शिंदे म्हणाले.