एकदा शब्द दिला तर मी स्वतःचेही ऐकत नाही, औरंगाबादेत मुख्यमंत्र्यांची तुफान डायलॉगबाजी
आज राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे औरंगाबाद दौऱ्यावर होते. मुख्यमंत्री शिंदेंची आज रोहया मंत्री संदीपान भुमरे यांच्या पैठण मतदारसंघात सभा पार पडली. यावेळी मुख्यमंत्री शिंदेंनी विरोधकांवर चांगेलच ताशेरे ओढले. सोबतच या सभेत बोलताना मुख्यमंत्री शिंदे धमाकेदार डायलॉगबाजी करताना दिसून आले.
शब्द दिला तर मी स्वतःचेही ऐकत नाही - मुख्यमंत्री
भुमरे यांच्या मतदार संघात बोलत असताना मुख्यमंत्री यांनी जोरदार भाषण केले. यावेळी त्यांनी डायलॉगबाजी सुद्धा केली. यावेळी भाषणात बोलताना मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, बाळासाहेब आणि आनंद दिघे यांनी शब्द पाळण्यास शिकवले आहे. एकदा शब्द दिला तर तो पाळतो.शब्द दिला तर मी स्वतःच देखील ऐकत नाही. अशी दमदार डायलॉगबाजी त्यांनी यावेळी केली.
सत्तातंराची लढाई सोप्पे नव्हती
मुख्यमंत्री शिंदे पुढे ते म्हणाले की,भुमरेसाहेब धाडसी माणूस आहेत. दिलेला शब्द पाळला. सर्व शासन, यंत्रणा एकीकडे तरी हे माझ्यासोबत असलेले 50 लोक सर्व जणांना पुरुन उरले. सत्तातंराची लढाई सोप्पे नव्हते. असे म्हणत त्यांनी मविआवर जोरदार निशाणा साधला.
ही पैसे देऊन जमवलेली गर्दी नाही
मुख्यमंत्री शिंदे यांच्या औरंगाबादच्या सभेआधी शिवसेना आमदार विधान परिषदेचे विरोधीपक्ष नेते अंबादास दानवे आणि माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी पैसे देऊन लोक बोलवले जात आहे असे गंभीर आरोप केले होते. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी भाषणा दरम्यान उत्तर दिले आहे. उत्तर देतांना मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, बाळासाहेबांची खरी सेना कुठली याचे उत्तर या विराट सभेने दिलेले आहे. ही पैसे देऊन जबरदस्ती जमवलेली गर्दी नाही. सर्व प्रेमाने आली आहेत. ही सच्चा शिवसैनिकांची गर्दी आहे. आम्ही बाळासाहेबांच्या विचाराला पसंती देणारी ही गर्दी आहे. असे जोरदार उत्तर यावेळी त्यांनी विरोधकांना दिले.