मुख्यमंत्री आता डॉ.एकनाथ शिंदे; म्हणाले, मी छोटी-मोठी ऑपरेशन...
नवी मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना डी.लीट पदवी देऊन सन्मानित करण्यात आले आहे. डी.वाय. पाटील युनिव्हर्सिटीकडून एकनाथ शिंदे यांना डी.लीट पदवी प्रदान करण्यात आली. सामाजिक, वैद्यकीय आणि आपत्कालीन व्यवस्थापन क्षेत्रात केलेल्या कामाबद्दल एकनाथ शिंदे त्यांना ही पदवी देण्यात आली. यावेळी राज्यपाल रमेश बैसही उपस्थित होते. मी आता डॉक्टर झालेलो नाही. तर याआधीही छोटी-मोठी ऑपरेशन केलेली आहे, असे एकनाथ शिंदे यांनी म्हणताच सभागृहात हशा पिकला.
मी आधीच डॉक्टर झालेलो आहे. छोटी-मोठी मी ऑपरेशन करत असतो. पण, मी या समाजामध्ये इतके वर्ष काम करत आहे. या कामाच्या माध्यमातून किंवा जगाच्या विद्यापीठाच्या माध्यमातून खूप काही शिकायला मिळाले, असे एकनाथ शिंदे म्हणाले आहेत. मी मुख्यमंत्री असलो तरी आजही कार्यकर्ता म्हणून काम करत आहे. आरोप करणाऱ्यांना मी उत्तर देत नसतो. त्यांना कामातून मी उत्तर देतो.
विनम्रता माझ्यासाठी महत्वाचे आहे. प्रत्येक माणसाने आयुष्यात कितीही चढ-उतार आले तरी विनम्र असावे. मी ही डी.लीट पदवी महाराष्ट्राच्या जनतेला समर्पित करतो. जनतेने प्रेम दिल्यामुळे मी आज मुख्यमंत्री आहे. अनेक संकट आली मात्र मी घाबरलो नाही. त्याचा सामना करत इथपर्यंत पोहचलो आहे. श्रीमंतांच्या यादीत माझे नाव येणार नाही. मात्र, माणुसकीच्या यादीत माझे नाव नक्की येईल, असेही त्यांनी म्हंटले आहे.