दिल्लीवारीवर केलेल्या उद्धव ठाकरेंच्या टीकेला मुख्यमंत्र्यांचे प्रत्युत्तर; म्हणाले, बोलणारांनी आधी...
राज्यात सध्या प्रचंड राजकीय गदारोळ सुरु आहे. त्यातच शिवसेना (ठाकरे गट) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज हिवाळी अधिवेशनाला हजेरी लावली. मात्र, यावेळी त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दिल्लीवारीवर टीका केली आहे. “एकनाथ शिंदे नवस फेडण्यासाठी दिल्लीवाऱ्या करतात” अशी टीका उद्धव ठाकरेंनी केली होती. त्याच टीकेला आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रत्युत्तर दिले आहे.
एकनाथ शिंदे म्हणाले, माझ्यावर कोण टीका करतंय? आज दिल्लीत वीर बाल दिवस होता. गुरुगोविंद सिंगांच्या सहा आणि नऊ वर्षांच्या दोन मुलांचं बलिदान झालं. त्यांचा सन्मान म्हणून केंद्र सरकारने २६ डिसेंबरला वीर बाल दिवस साजरा केला. गुरुगोविंद सिंग, महाराष्ट्र आणि पंजाब यांचं नातं असल्याने मला केंद्र सरकारच्या या कार्यक्रमाला बोलावलं होतं. खरं म्हणजे माझ्या दिल्ली दौऱ्यावर बोलणारांनी आधी माहिती घेतली पाहिजे होती की, मी दिल्लीला कुठल्या कार्यक्रमाला चाललो आहे. त्या मुलांनी स्वतःच्या प्राणांचं बलिदान दिलं. परंतु आपला स्वाभिमान जाऊ दिला नाही. अशा शौर्याच्या गाथा निर्माण करणाऱ्या मुलांनी आदर्श घालून दिला. असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यावेळी म्हणाले आहे.
उद्धव ठाकरेंनी सर्वोच्च न्यायालयाचा निकाल लागेपर्यंत वादग्रस्त सीमाभाग केंद्रशासित प्रदेश करण्याची मागणी केली. त्यावर उत्तर देतांना मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात न्यायप्रविष्ठ आहे. पहिल्यांदाच केंद्रिय गृहमंत्र्यांनी यात हस्तक्षेप केला आणि दोन्ही राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना बोलावलं. तसेच खटला न्यायालयात आहे तोपर्यंत कुठलाही कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न तयार होऊ नये याच्या सूचना त्यांनी दिल्या. हा विषय ६० वर्षांचा आहे. असं असताना या खटल्यावर कोणताही परिणाम होऊ नये याची आम्ही काळजी घेत आहोत. ती काळजी कर्नाटकनेही घेतली पाहिजे. हा एकनाथ शिंदे सीमा आंदोलनात तुरुंगवास भोगलेला व्यक्ती आहे. त्यामुळे त्यावर आम्हाला इतरांनी शिकवण्याची गरज नाही,” असं प्रत्युत्तर शिंदेंनी दिलं.