शीतल म्हात्रे प्रकरणावरुन चित्रा वाघ आणि उर्फी जावेदमध्ये जुंपली; एकमेकींना दिला इशारा
मुंबई : शिवसेनेच्या प्रवक्त्या शीतल म्हात्रे आणि आमदार प्रकाश सुर्वे यांचा एक व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ मॉर्फ करुन सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आला आहे. त्यामुळे या व्हिडिओवरून सध्या राजकारण चांगलंच तापल्याचे दिसून येत आहे. अशातच, यावरुन उर्फी जावेद आणि चित्रा वाघ यांच्यात पुन्हा एकदा जुंपल्याचे दिसले आहे. चित्रा वाघ यांनी शीतल म्हात्रेंना पाठिंबा देत निषेध व्यक्त केला आहे. याचवरुन उर्फी जावेदने चित्रा वाघांवर निशाणा साधला आहे. तर, चित्रा वाघ यांनीही प्रत्युत्तर दिले आहे.
काय म्हणाली उर्फी जावेद?
चित्रा वाघ यांनी ट्विट करत शितल...तू लढ आम्ही सगळ्या तुझ्या सोबत आहोत. या हरामखोरांना सोडू नकाचं पण यांचा करविता धनी कोण आहे त्याला शोधून काढत त्याच्या आधी मुसक्या आवळा, असे आवाहन पोलिसांना केले होते. यावरुन उर्फी जावेदने चित्रा वाघ यांना डिवचले आहे. माझी वेळ विसरलात वाटतं. जेव्हा माझ्या कपड्यांवरून माझ्या कॅरेक्टरवर बोट दाखवत होतात. मला तुरूंगात टाकण्याची मागणी करत होतात. सगळ्यांसमोर उघड उघड माझं डोकं फोडण्याची धमकी देत होतात. वाह वाह वाह वाह हिपोक्रसीचीही काहीतरी सीमा असते हे या महिलेला कोणीतरी सांगा, असा टोला उर्फीने चित्रा वाघ यांना लगावला आहे.
चित्रा वाघ यांचे प्रत्युत्तर
जे उघडपणे स्वतःचे शरीरप्रदर्शन करतात आणि स्वतःच्या प्रसिद्धीसाठी नग्न नाचतात. त्यांची तुलना त्यांच्या सांसारिक जबाबदाऱ्या सांभाळून समाजासाठी योगदान देणाऱ्या महिलांशी होऊ शकत नाही. हे विचारात घेणे गरजेचे आहे. सुधारा, जे काही चालले आहे, वेळ खराब व्हायला वेळ लागणार नाही, हे लक्षात ठेवा, असा इशाराच चित्रा वाघ यांनी उर्फी जावेदला दिला आहे.
दरम्यान, शीतल म्हात्रे यांच्या व्हायरल व्हिडिओ प्रकरणाची गंभीर दखल राज्य महिला आयोगाने घेतली आहे. तर, शंभूराज देसाई यांनी या संपूर्ण प्रकरणाचा तपास एसआयटीकडे सोपविण्यात येत असल्याची घोषणाही विधीमंडळात केली आहे. दरम्यान, याप्रकरणी आतापर्यंत पाच जणांना ताब्यात घेतले आहे. यात आदित्य ठाकरे यांचे निकटवर्तीय साईनाथ दुर्गे यांना पोलिसांना ताब्यात घेतले आहे.