मुख्यमंत्री शिंदेंनी टाळली छत्रपती संभाजीराजेंची भेट

मुख्यमंत्री शिंदेंनी टाळली छत्रपती संभाजीराजेंची भेट

समाजाचे प्रश्न घेऊन आलेल्या छत्रपती संभाजीराजेंना भेटण्यास मुख्यमंत्र्यांना वेळ नाही
Published on

चेतन ननावरे | मुंबई : छत्रपती संभाजीराजे भोसले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीसाठी गेले असता त्यांनी भेट सस्पेशल टाळली आहे. यावरुन मुख्यमंत्र्यांना पक्ष प्रवेशासाठी आलेल्या नेत्यांना भेटण्यासाठी वेळ आहे. मात्र, समाजाचे प्रश्न घेऊन आलेल्या छत्रपती संभाजीराजेंना भेटण्यास वेळ नाही, अशा संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. दरम्यान, आता या घटनेवरुन राजकारण तापण्याची शक्यता आहे.

मराठा समाजाच्या प्रश्नांच्या पाठपुराव्यासाठी आज छत्रपती संभाजीराजे मंत्रालय येथे आले होते. प्रथम त्यांनी सामान्य प्रशासन विभागाचे सचिव सुमंत भांगे यांची भेट घेऊन आढावा घेतला व त्यानंतर ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दालनाकडे गेले. यावेळी छत्रपती संभाजीराजे यांच्यासह मराठा समाजाचे समन्वयक व समाजाचे प्रतिनिधी देखील उपस्थित होते.

मात्र, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तब्बल दीड ते दोन तास छत्रपती संभाजीराजे यांची भेट टाळली. या कालावधीत ते पक्ष प्रवेशासाठी आलेल्या नेत्यांच्या गाठीभेटी घेत राहिले. पण, समाजाचे प्रश्न घेऊन आलेल्या छत्रपती संभाजीराजे यांनी वारंवार निरोप देऊनही ताटकळत राहावे लागले. या प्रकारानंतर छत्रपती संभाजीराजे मुख्यमंत्री कार्यालयातून तडकाफडकी निघून गेले.

दरम्यान, जळगाव येथील एका पोलिस निरीक्षकाची मराठा समाजाबद्दल अक्षेपार्ह वक्तव्य केल्याची एक ऑडिओ क्लीप सध्या सोशल मीडियामध्ये व्हायरल होत आहे. या ऑडिओ क्लीपमध्ये एक पोलिस अधिकारी एका विशिष्ठ व्यक्तीद्दल बोलताना संपुर्ण मराठा समाजाबद्दल आक्षेपार्ह विधान करत असताना ऐकू येत आहे. ही क्लीप व्हायरल झाल्यानंतर संभाजीराजे छत्रपती यांनी या पीआयला तात्काळ निलंबित करावे, अशी मागणी केली होती.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com