शिवसेना अन् मशालीचं नात जुनंच; खुद्द छगन भुजबळांनी सांगितला किस्सा
मुंबई : शिवसेनेचे धनुष्यबाण चिन्ह गोठवल्यानंतर निवडणूक आयोगाने नवे चिन्ह आणि नाव दिले आहे. ठाकरे गटाला शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे नाव व मशालीचे चिन्ह मिळाले आहे. यानंतर शिवसैनिकांनी जल्लोष केला असून ठिकठिकाणी मशाल रॅली काढण्यात आली आहे. शिवसेनेला पहिल्यांदाच मशाल हे चिन्ह मिळालेले नाही. याआधीही शिवसेनेने मशाल चिन्हावर निवडणुकीत विजय मिळवला आहे. यासंबंधीचा इतिहास सोशल मीडियावर विविधनेते सांगत आहे. तर, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनीही स्वतःही गोष्ट कबुल केले आहे. कारण शिवसेनेकडून मशाल चिन्हावर दुसरे-तिसरे कोणी नसून छगन भुजबळ हेच होते.
याविषयी छगन भुजबळ म्हणाले की, 75 वर्ष म्हणजे काही जास्त वय नाहीय. मी जेव्हा शिवसेनेत होतो. तेव्हा 15 शाखा प्रमुख झाले त्यातला मी एक शाखा प्रमुख होतो. आरएसएसमधील एक जण शिवसेनेत आला आणि ते लोकसभा देखील लढले होते. मराठी माणसासाठी लढायचे हाच एक हेतू होता. तेव्हा पार्टी रजिस्टर नव्हती. 1978 साली मी निवडून आलो आणि गटनेता झालो. यानंतर इंदिरा गांधी यांची हत्या झाली.
1985 साली लोकसभा निवडणूक झाली व त्यानंतर दोन महिन्यांनी विधानसभा निवडणूक झाली. विधानसभा निवडणुकीत मी मशाल हे चिन्ह घेतले. शिवसेनेचे चिन्ह वाघ आम्ही समजायचो. पण, वाघाचे चित्र काढायला कठीण. त्यामुळे मी मशाल चिन्ह घेतले. निवडणुकीत शिवसेनेतून मी एकटाच निवडून आलो. यानंतर बाळासाहेब ठाकरे यांनी महापालिका निवडणुकीत मला पुढे केले. व आमचे त्यावेळी 74 नगरसेवक निवडून आले. बाळासाहेब ठाकरे यांनी मला महापौर केले. मी आमदार आणि महापौर झालो, असे त्यांनी सांगितले आहे.
जे आता भाजपसोबत गेले. 2014 नंतर हेच लोक भाजपच्या विरोधात बोलत होते. खिशात राजीनामे घेऊन फिरत होते, अशी टीकाही त्यांनी शिंदे गटावर केली आहे. अटल बिहारी वाजपेयी बाळासाहेब ठाकरे यांना म्हणाले होते की, तुमच्याकडे भुजबळ आहेत आणि आमच्याकडे बुध्दीबळ आहे. आपण एकत्र येऊ, असेही त्यांनी सांगितले. एक वर्ष असे गेले होते बाळासाहेब ठाकरे यांनी संपूर्ण पाठींबा काँग्रेसला दिला होता, असेही महत्वपूर्ण विधान त्यांनी केले आहे.
बाळासाहेब ठाकरे यांनी मला संधी दिली. या निवडणुकीत देखील शिवसेनेला पाठींबा दिला. मला वाटत ही निवडणूक उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला जड जाणार नाही. दोन ते चार महिन्यात ज्या गोष्टी घडल्या त्या त्रास देणाऱ्या होत्या. शिवसेनेसाठी अनेकांनी बलिदान दिले आहे. शिवसेना नाव आहे हाच काय तो आनंद आहे. शिवसेना ही काही संपणार नाही. शिवसेना वर येईल, असा विश्वास छगन भुजबळ यांनी व्यक्त केला आहे.