उद्धव ठाकरे आपल्याकडे आले तर पेढेच नाही तर...; छगन भुजबळांची प्रतिक्रिया
नागपूर : मंत्री छगन भुजबळ यांच्याविरुद्ध महाराष्ट्र सदनमधील भ्रष्टाचारप्रकरणी ईडीने दाखल केलेली याचिका मागे घेतली आहे. यावर उद्धव ठाकरे यांनी मी आता भुजबळांकडे पेढा खायला तर प्रफुल्ल पटेलांकडे कमी मिरची असलेले जेवण करायला जाणार आहे, असा टोला लगावला होता. यावर आता छगन भुजबळांनी प्रतिक्रिया दिली आहे. उद्धवजी माझ्या घरी पेढा खायला आले तर आनंद आहे त्यांना आवडेल तसं जेवण वगैरे देऊ, असे भुजबळांनी म्हंटले आहे.
छगन भुजबळ म्हणाले की, उद्धवजी माझ्या घरी पेढा खायला आले तर आनंद आहे. त्यांना आवडेल तसं जेवण वगैरे देऊ ते कधीही येऊ शकतात. ज्या कारणामुळे ते म्हणाले ते कारण चुकीचं वर्तमानपत्रात किंवा मीडियामध्ये आलेला आहे. अजून केस मागे घेतलेली नाही ही एक दुसरी केस होती. काहीतरी प्रदेशात जायचं होतं आणि त्यावेळेला जी परवानगी आम्ही मागितली त्यावेळी मला नोटीस मिळाली होती. त्यावर सुनावणी होऊन आम्ही विसरलो होतो आणि अधिकारीही विसरले होते, त्यानंतर त्यांनी ती मागे घेतली, अशी माहिती त्यांनी दिली.
तसेच, सर्वोच्च न्यायालयाचे जजमेंट आहे की निकाल हा रद्दबातल झाला असेल तर आपोआपच ईडीचा गुन्हाही रद्दबातल होते. महाराष्ट्र सदन केस याच्यातून आम्ही डिस्चार्ज झालो. त्यामुळे आम्ही प्रयत्न करतोय की सुप्रीम कोर्टाने जो निकाल दिला आणि त्याप्रमाणे आमच्याही केसेस निकाली निघाल्या पाहिजे, यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत, असे त्यांनी म्हंटले आहे.