शिवसेना फुटली हे अजूनही मनाला पटत नाही; भुजबळांनी व्यक्त केली भावना
नाशिक : शिवसेनेचा आज 57वा वर्धापन दिन आहे. शिवसेनेच्या इतिहासात पहिल्यांदाच शिवसेनेचे दोन वर्धापन दिन साजरे होणार आहे. वर्धापन दिनानिमित्त उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे पुन्हा एकदा भिडणार आहेत. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनी प्रतिक्रिया दिली आहे. शिवसेना फुटली हे अजूनही मनाला पटत नाही, अशा भावना त्यांनी व्यक्त केली. आता खरी शिवसेना लोक ठरवतील, असेही त्यांनी म्हंटले आहे.
सगळ्या शिवसैनिकांना जय महाराष्ट्र. शिवसेनेचा ५७ वा वर्धापन दिन आहे त्यानिमिताने शुभेच्छा देतो. पहिले २५ वर्षे मला आजही आठवतात. पहिले शाखाध्यक्ष झाले त्यात मी पण होतो. मी १९७८ मध्ये गटनेता झालो होतो त्यानंतर बाळासाहेब यांनी मला भाषण करण्याची संधी दिली. शिवसेनेने मला गटनेता, महापौर, आमदार केलं. शिवसेना फुटली हे अजूनही मनाला पटत नाही, अशा भावना छगन भजबळ यांनी व्यक्त केल्या आहेत.
वाईट वाटतं शिवसेना फुटायला नको होती. अभ्येद्य एकजुट असायची कठीण परिस्थिती बाळासाहेब उभे राहायचे त्यांच्यासोबत लोक उभे राहायचे. बाळासाहेबांनी शब्द दिला की लोक पाळायचे, पोलिसांची भीती नसायची. शिवसेना अभ्येद्य राहावी ही इच्छा आहे, असेही भुजळांनी बोलून दाखवले आहे.
मनीषा कायंदे मॅडम अचानक कसे काय गेल्या? कायदे कट्टर वाटल्या होत्या, आठ-नऊ महिने सोबत होत्या. पण, प्रवाह चालूच आहे. अडचणी येत आहे, मार्ग निघेल. खरी शिवसेना बाळासाहेब ठाकरे यांचीच, पण आता दोन झाल्या. आता खरी शिवसेना लोक ठरवतील, असेही त्यांनी म्हंटले आहे.