जालन्यात लाठीचार्ज कसा घडला? गृहमंत्र्यांनी सत्य सांगायला हवं होतं; भुजबळांचा घणाघात
जालना : जिह्यातून मराठा आरक्षणाचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला. मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वात आरक्षणाच्या मुद्द्यासाठी मराठा बांधव रस्त्यावर उतरला. त्याच जालन्यात आज ओबीसी समाजाची जाहीर एल्गार महासभा झाली आहे. या सभेत छगन भुजबळ यांनी मनोज जरांगे पाटलांवर जोरदार हल्लाबोल केला आहे.
छगन भुजबळ म्हणाले की, उपोषण सुरु असतांना पोलिसांनी विनंती केली. त्यांची विनंती समजून न घेता त्यांच्यावर दगडफेक करण्यात आली. यामध्ये ७० हून अधिक पोलीस जखमी झाले. मात्र एकच बाजू सगळीकडे दाखविण्यात आली. ते पोलीस काय पाय घसरून पडले काय? असा सवाल उपस्थित करून ज्या महिला पोलिसांवर हल्ला झाला त्यांच्यावर जी परिस्थिती आली त्याची चौकशी व्हायला हवी.
राज्याच्या पुढे देशाच्या पुढे खर चित्र न येता पोलिसांना दोष देण्यात आला. पोलिसांवर होत असलेल्या अन्यायामुळे पोलिसांनी देखील बीडमध्ये बघ्याची भूमिका घेतली. त्यांनतर बीडमध्ये आंदोलकांनी कोयते, चॉपर, पेट्रोल बॉम्ब घेऊन आमदार व ओबीसी पदाधिकाऱ्यांच्या घरांवर हल्ले करून त्यांच्या मालमत्तेच प्रचंड नुकसान करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. गृहमंत्री फडणवीसांनी सत्य सांगायला हवं होतं, असेही त्यांनी म्हंटले आहे.
दरम्यान, मराठा आरक्षणासाठी लढणारे मनोज जरांगे-पाटील हे पश्चिम महाराष्ट्राच्या दौऱ्यावर असून त्यांची सांगली जिल्ह्यातील विटा येथे पहिली सभा आज पार पडली. गेल्या ७० वर्षापासून मराठ्यांचे वाटोळे कोणी केले, त्याचे नाव आता आम्हाला कळायला पाहिजे, असे आव्हान मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे-पाटील यांनी सरकारला दिले. सरकारने शहाणपणाची भूमिका घेतली पाहिजे. नाहीतर सरकारला यापुढील काळ जड जाईल, असा इशाराही जरांगेंनी यावेळी दिला.