Chagan Bhujbal : कानूनी लोचा तयार झालाय
मुंबई : अपात्रतेबाबत शिवसेनेच्या (Shivsena) याचिकेवर आज सर्वोच्च न्यायलयात सुनावणी झाली आहे. याप्रकरणी आता 1 ऑगस्टला पुढील सुनावणी होणार असून 29 जुलै रोजी प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते छगन भुजबळ (Chagan Bhujabal) यांनी कानूनी लोचा तयार झाला आहे, अशी प्रतिक्रिया दिली आहे.
छगन भुजबळ म्हणाले की, जैसै थे राहू द्या, असे कपिल सिब्बल यांनी सांगितले आहे. पण, स्टेटस्को कशावर? आमदार अपात्रेवर की मंत्रिमंडळ विस्तारावर? हे कळले नाही. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उद्धव ठाकरे पक्षातून बाहेर पडल्यावर दुसऱ्या पक्षात जाण्याची कायद्यात तरतूद आहे. पण सध्या कानूनी लोचा तयार झाला आहे, असे त्यांनी म्हंटले आहे.
सर्वोच्च न्यायालयाने पक्षांतर्गत गोष्टीत हस्तक्षेप केलेला नाही. एकापाठोपाठ एक गोष्टी घडत आहेत. हरिश साळवे यांनी एका आठवड्याची मुदत मागितली आहे. सर्वोच्च न्यायालयाने १ ऑगस्टपर्यंत मुदत दिली आहे. मोठ्या घटनापीठासमोर मांडण्याचा प्रश्न न्यायमुर्ती यांनी उपस्थित केला आहे. त्यामुळे पुढे हे प्रकरण मोठ्या घटनापीठासमोर जातेय की काय अशी परिस्थिती निर्माण झाली आहे, असेही त्यांनी सांगितले.
शिंदे गट दुसऱ्या पक्षात गेले नाही. स्वतःच्या पक्षात उठाव केला आहे. शिवसेनेचे म्हणणे व्हीप मोडला आहे. बंडखोर बैठकीस येत नाहीत. गुवाहाटीवरून निर्णय घेणे चुकीचे आहे. यामुळे अनेक प्रश्नांची गुंतागुंत निर्माण झाली आहे. हे प्रकरण देशातील सर्व पक्ष व नेत्यांना मार्गदर्शक ठरेल, असे मत भुजबळांनी मांडले आहे.