'मी मंदिरात का जातो'?; इस्रोचे प्रमुख एस. सोमनाथ म्हणाले...
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांचा विदेश दौरा संपल्यानंतर बंगळुरू या ठिकाणी पोहचून इस्रोच्या शास्त्रज्ञांचं कौतुक केलं. त्यानंतर रविवारी इस्रोचे प्रमुख एस. सोमनाथ यांनी तिरुवनंतपुरम या ठिकाणी जाऊन भद्रकाली देवीचं दर्शन घेतलं.
त्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. इस्रोचे प्रमुख एस. सोमनाथ म्हणाले की, आपल्या ब्रह्मांडाचा शोध घेणं जसं महत्त्वाचं आहे तसंच आपल्या अस्तित्वाचा शोधही आवश्यक आहे. मंदिरं ही आपल्या संस्कृतीचा एक भाग आहेत.मी शास्त्रज्ञ आहे आणि शोध घेणं हे माझं काम आहे. मी चंद्राबाबत शोध घेतो अगदी त्याचप्रमाणे अध्यात्माचाही शोध घेतो.
तसेच ते पुढे म्हणाले. मंदिरं ही आपल्या संस्कृतीचा एक भाग आहेत. ब्रह्मांडात काय दडलंय यासाठी शास्त्रीय प्रयोग आवश्यक आहेत आणि आत्म्याला शांतता लाभली पाहिजे यासाठी मंदिरात येणं आवश्यक आहे. नवनव्या गोष्टी शोधणं मग ते विज्ञान असो की अध्यात्म मला आवडतं. याच कारणांसाठी मी मंदिरांमध्येही जातो, धर्मग्रंथ वाचतो. असे सोमनाथ म्हणाले.
आपण जे काही करतो आहोत त्याचं एक महत्त्व आहे. शिवशक्ती या नावात काहीच गैर नाही. शिवशक्ती आणि तिरंगा ही दोन्ही नावं भारतीय आहेत. चांद्रयान ३ च्या टचडाऊन पॉईंटला शिवशक्ती नाव देण्यात चुकीचं काहीही नाही. असे देखिल सोमनाथ म्हणाले.