नाना पटोलेंनी होळीच्या दिवशी किमान टिका करु नये : बावनकुळे
कल्पना नलसकर | नागपूर : होळी सणाच्या पार्श्वभूमीवर होळीमध्ये सत्तेत बसलेल्या सदबुद्धी यावी, अशी प्रार्थना कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली होती. यावर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रत्युत्तर दिले आहे. नाना पटोले यांनी होळीच्या दिवशी किमान टिका करु नये. पंचमीच्या दिवशी सांगू. आज तरी त्यांनी पक्ष फुटतोय ते थांबवावे. नाना यांनी होळीसमोर नतमस्तक होऊन काँग्रेस फुटू नये अशी प्रार्थना करावी, असा पलटवार बावनकुळे यांनी केला आहे.
या सरकारच्या काळात शेतकऱ्यांना भरपूर नुकसान भरपाई वितरीत झाली आहे. आताही झालेल्या नुकसानीची मदत मिळेल. तर, तालिबानी कोण आहे? हे महाराष्ट्राला माहित आहे. अडीच वर्षे सत्तेच्या काळात किती तालिबानी वागले हे सर्वांना माहित आहे, असा निशाणा बावनकुळेंनी संजय राऊतांवर साधला आहे.
धीरज देशमुख यांनी मराठी सीमाबांधवांच्या जखमेवर मीठ चोळले आहे. आता संजय राऊत, उद्धव ठाकरे गप्प का आहेत? आता हे झोपलेत का? त्यांच्या प्रतिक्रियेची आम्ही सर्व वाट पाहत आहोत. उद्धव ठाकरे तर अशा विषयी लवकर प्रतिक्रिया द्यायचे. धीरज देशमुख यांच्या वक्तव्याचा आम्ही निषेध व्यक्त करतो.
चौघांनी एकत्र यावं, आम्ही ५१ टक्के मतांची तयारी केली आहे. शरद पवार यांनी कसबा निवडणूकीचं विश्लेषक करावं. हा महाविकास आघाडीचा नाही, तर धंगेकरांचा विजय आहे. त्यांच्याबद्दल सहानुभूती होती. आम्ही कसब्यामध्ये आमची मतं घेतलीच आहे. महाविकास आघाडी ला मिळालेली जास्त मते धंगेकर यांची आहेत. महाविकास आघाडी सरकारला कसब्याचा प्रयोग महाराष्ट्रात करायला थांबवलं कुणी आहे? आम्ही आमची ५१ टक्क्यांची तयारी करतो आहे, असेही त्यांनी सांगितले.
उद्धव ठाकरे यांच्या सभेला मोठं करण्यासाठी पैशांचा गैरवापर केला जातो. तिन्ही पक्षाचे कार्यकर्ते पाठवले जाते. उद्धव ठाकरे यांच्यामागे सहानुभती आहे असे दाखवण्याचा तिन्ही पक्षाचा हा प्रयत्न आहे. पण सहानुभती मिळणार नाही. राहीलेले आमदार, लोकप्रतिनिधी टिकवण्यासाठी उद्धव ठाकरे दौरे करतात. उद्धव ठाकरे यांनी हिंदूत्त्वाशी समझोता केला म्हणून कार्यकर्ते टिकणार नाही, अशीही टीका बावनकुळेंनी केली आहे.