जगदंबेची शपथ घ्या! बावनकुळेंचे उध्दव ठाकरेंना आव्हान; असेल हिंमत तर एकदा...
मुंबई : शिंदे-फडणवीसांविरोधात उद्धव ठाकरे सध्या विदर्भ दौऱ्यावर आहेत. यादरम्यान, उद्धव ठाकरे यांनी भाजपावर हल्लाबोल केला होता. पोहरादेवीची शपथ घेऊन सांगतो अडीच वर्ष शिवसेनेचा आणि अडीच वर्ष भाजपचा मुख्यमंत्री ठरला होता, असे त्यांनी म्हंटले होते. याला आता भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रत्युत्तर दिले आहे. घ्या, जगदंबेची शपथ, वंदनीय हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे "सुत" आहात, तर आता सांगाच तुमचे "सुत" कोणाशी जुळले होते, असा खरमरीत सवाल बावनकुळेंनी उध्दव ठाकरेंना केला आहे.
चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, उद्धवजी, केंद्र सरकारच्या लोकाहिताच्या योजनांना फसव्या, बोगस म्हणून तुम्ही बांधावर, टपरीवर चर्चा करणार असाल तर, होऊ द्या चर्चा! पण, सद्या एकच चर्चा आहे ती म्हणजे, तुम्ही जागोजागी देवाधिकांच्या "शपथा" का घेताहात? मग, असेल हिंमत तर एकदा शपथेवर सांगाच. 2019 च्या विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर देवेंद्र फडणवीस यांचे फोन तुम्ही का घेतले नाहीत? घ्या, जगदंबेची शपथ !! वंदनीय हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे "सुत" आहात, तर आता सांगाच तुमचे "सुत" कोणाशी जुळले होते? घ्या शपथ आणि कळू द्या तुमची वचनबद्धता. उध्दव ठाकरेजी, चर्चा तर होणारच, असा निशाणा त्यांनी साधला आहे.
काय म्हणाले होते उध्दव ठाकरे?
अमित शहा आणि माझे ठरले होते. त्यांनी कितीही नाही म्हणोत, मी माझ्या आई-वडिलांची शपथ घेऊन शिवाजी पार्कवर हे बोललो आहे. आता पोहरादेवीची शपथ घेऊन सांगतो अडीच वर्ष शिवसेनेचा आणि अडीच वर्ष भाजपचा मुख्यमंत्री ठरला होता, असे म्हणत माझ्या पक्षाचं नाव मी कोणाला देणार नाही. निवडणूक आयोगाचा तो अधिकारच नाही. निवडणूक आयोग चिन्हाबाबत निर्णय घेऊ शकते, असेही उध्दव ठाकरे यांनी म्हंटले आहे.