उध्दव ठाकरे हे भविष्यात ओवेसीशी युती करतील; बावनकुळेंचा घणाघात
उदय चक्रधर | भंडारा : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीचा मुहूर्त साधून शिवसेना आणि वंचित बहुजन आघाडीच्या युतीची घोषणा करण्यात आली आहे. यावर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी कडाडून टीका केली आहे. बाळासाहेबांचे विचार बाजूला सारणारा उध्दव ठाकरे हे भविष्यात ओवेसीशी युती करतील, असा जोरदार टोला बावनकुळेंनी लगावला आहे. ते आज भंडाऱ्यात बोलत होते.
उद्धव ठाकरे हे सत्तेत असताना त्यांनी बाळासाहेब ठाकरे यांचे सभागृहात तैलचित्र लावले असते. मात्र, ते प्रगल्भ विचाराचे नाहीत. वडील म्हणून तुम्हाला खूप काळ सहानभूती मिळवता येणार नाही. मोदींबद्दल बोलण्याची उंची उद्धव ठाकरे यांची नसल्याची टीका चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली.
अंबादास दानवे यांनी केलेल्या वक्तव्यावर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी खरमरीत टीका केली. अंबादास दानवे हे आता नवीन आहेत. उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांचा विचार बाजूला करून शरद पवार यांच्या मांडीला मांडी लावून बसले आहेत. ज्या प्रकाश आंबेडकरांनी जीवनभर बाळासाहेब ठाकरे यांचा विरोध केला. त्यामुळे आता पातळी एवढ्या खाली गेली आहे की, उद्धव ठाकरे भविष्यात ओवेसी यांच्याशी युती करतील.
2019 मध्ये शिवसेनेचे जे खासदार निवडून आलेत ते केवळ मोदींमुळे आणि राज्याचा जनादेश हे देवेंद्र यांना होता. निवडणुकीच्या प्रचारसभांमध्ये उद्धव ठाकरे यांनी कबूल केलं होतं की, निवडणुका मोदी आणि फडणवीस यांच्या नेतृत्त्वात लढत आहेत. उद्धव ठाकरे यांची विसरण्याची पद्धत वाढली आहे. त्यांनी त्यांची जुनी भाषणे काढून पहावी, असा टोला चंद्रशेखर बावनकुळे यांनी लगावला आहे.