चंद्रकांत पाटलांनी केली सावंतांची पाठराखण; म्हणाले, माझी हात जोडून विनंती...
अमोल धर्माधिकारी | पुणे : आरोग्यमंत्री तानाजी सावंत हे अनेक वेळा आपल्या वक्तव्यांमुळे चर्चेत असतात. यावेळी मराठा आरक्षणाप्रकरणी सावंत यांनी वादग्रस्त वक्तव्य केले आहे. यामुळे त्यांच्यावर सर्वच स्तरातून टीकेची झोड उठविण्यात येत आहेत. अशातच भाजप नेते चंद्रकांत पाटील यांवी सावंतांची पाठराखण केली आहे. तानाजी सावंत यांनी एखादे वाक्य म्हटलं की त्याची तोडमोड करून ते समोर आणलं जातं, असे चंद्रकांत पाटलांनी म्हंटले आहे.
चंद्रकांत पाटील म्हणाले की, तानाजी सावंत यांनी एखादे वाक्य म्हटलं की त्याची तोडमोड करून ते समोर आणलं जातं. त्यातील ग्रामीण आणि शहरी भावना व्यक्त करताना गोंधळ होतो. आमच्या रावसाहेब दानवे यांच्या बाबतीतही नेहमी हेच होतं. पण, ग्रामीण भागातील लोकांना विचारलं की ते म्हणतात, यात काय आहे. तानाजी सावंतांना एवढेच म्हणायचं होतं की मराठा समाजाला आरक्षण जवळजवळ स्वातंत्र्यापासून पहिल्यांदा देवेंद्र फडणवीस यांनी आरक्षण दिलं. म्हणजे भाजप सरकारने दिलं ते हायकोर्टात टिकवलं. ते सुप्रीम कोर्टात एक वर्ष टिकलं. मग, अडीच वर्षात आंदोलन का केली नाही, असं तानाजी सावंत यांना म्हणण्याचा अर्थ आहे.
माझी हात जोडून विनंती आहे की ज्यावेळी एखादी मागणी होते. तेव्हा उठसूट गैरसमज करून घेण्याची काही गरज नाही. त्यांचं पुढचं वाक्य हे होतं की, आता आपलं सरकार आलंय आपण करूया, अशी सारवासारव चंद्रकांत पाटील यांनी केली आहे.
तर, यावेळी बोलताना पीएफआय कारवाईच्या गोंधळाबद्दल विचारले असता चंद्रकांत पाटील यांनी देशाच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून संवेदनशील असलेल्या विषयाने आपल्याला अपुरी माहिती असेल तर आपण काही म्हणू नये. मी यावर कुठलीही टिप्पणी करणार नाही. गृहमंत्री कायद्याचे ते तज्ञ आहेत कायद्याचे विद्यार्थी आहेत. त्यामुळे ते योग्य भूमिका घेतात, अशी प्रतिक्रिया दिली आहे.
दरम्यान, आम्हाला ओबीसीमधून आरक्षण पाहिजे, आम्हाला एसटीमधून आरक्षण पाहिजे अशा मागण्या होत आहेत. अहो हे कोण आहेत? याच्या मागचा करता करविता कोण आहे? हे तुम्हा-आम्हाला माहित असणं गरजेचं आहे. हे सर्वांना माहिती आहे फक्त कुणी बोलत नाही. तुम्हाला मराठा आरक्षणाची खाज सत्तांतरण झाल्यानंतर सुटली, असे वक्तव्य तानाजी सावंत यांनी एका कार्यक्रमात केले होते.