चंद्रकांत पाटलांवर शाईफेक, वादग्रस्त विधानाचे राज्यभर पडसाद
राज्यात अभूतपूर्व गोंधळ सुरु आहे. त्यातच राजकीय मंडळींकडून वादग्रस्त विधानांचे सत्र सुरु आहे. या सर्वादरम्यान काल भाजप मंत्री चंद्रकांत पाटील यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले आणि कर्मवीर भाऊराव पाटील यांच्याबद्दल वादग्रस्त विधान केले होते. या विधानामुळे विरोधक चांगलेच आक्रमक झाले होते. त्यांनतर आज देखील या विधानाचे पडसाद आज सर्वत्र दिसून आले आहे. दरम्यान, पुणे दौऱ्यावर असताना पिंपरी- चिंचवड येथे भाजप मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर शाईफेक करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. ही शाईफेक कोणत्या संघटनेकडून करण्यात आलीय हे स्पष्ट झालेले नाही.
आज चंद्रकांत पाटील पिंपरी-चिंचवडमध्ये मोरया गोसावी महोत्सवासाठी पिंपरी चिंचवडमध्ये आले होते. ते पिंपरी चिंचवडमध्ये आपल्या एका कार्यकर्त्याच्या घरी थांबले होते. कार्यकर्त्याच्या घरून निघाल्यानंतर चंद्रकांत पाटील यांच्यावर शाईफेक करण्यात आली आहे. या प्रकरणात तीन जणांना पोलिसांना ताब्यात घेतलं आहे.
नेमकं काय म्हणाले चंद्रकांत पाटील?
पैठण येथील कार्यक्रमात बोलत असताना चंद्रकांत पाटील म्हणाले की, त्या काळात सरकार शाळांसाठी अनुदान देत नव्हते. तरीसुद्धा महापुरुषांना शाळा उघडल्या केल्या. मात्र, आता लोकं शाळांच्या अनुदानासाठी सरकारवर अवलंबून राहतात. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले आणि कर्मवीर भाऊराव पाटील यांनी शाळा सुरू केल्या. या शाळा सुरू करताना सरकारनं त्यांना अनुदान दिलं नाही. त्यांनी लोकांकडं भीक मागितली. असं म्हणताना चंद्रकांत पाटील यांनी गळ्यातलं मफलर पुढे केले. ते म्हणायचे मला पैसे द्या. त्या काळात दहा रुपये देणारे होते. आता दहा कोटी रुपये देणारे आहेत. सीएसआरच्या माध्यमातून कंपन्यांच्या नफ्यातून दोन टक्के खर्च करण्यासाठी कायदा झाला आहे. असे चंद्रकांत पाटील म्हणाले होते.