काँग्रेसवर केलेल्या 'त्या' विधानावरून खैरेंनी घेतली माघार; म्हणाले, हे बोललो नसून मागील बाब...
शिंदे गटातील १६आमदार अपात्र ठरले तरी सरकार पडू नये आणि आपल्याला मुख्यमंत्री पद मिळावे यासाठी देवेंद्र फडणवीस यांनी काॅंग्रेसच्या २२ आमदारांची सोय करून ठेवली आहे, असा खळबळजनक दावा शिवसेना(ठाकरे गट) नेते चंद्रकांत खैरे यांनी काल औरंगाबादेत केला होता. परंतु चंद्रकांत खैरे यांच्या या विधानानंतर काँग्रेसच्या नेत्यांकडून देखील यावर उत्तर देण्यात आले. मात्र, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी खैरेंना माफी मागण्याची मागणी केली होती. त्यानंतर चोवीस तासाचा आत आता चंद्रकांत खैरे यांनी दिलगिरी व्यक्त केली आहे.
माध्यमांशी बोलताना खैरे म्हणाले की, 22 आमदार फडणवीस यांच्या संपर्कातील ही बातमी फार जुनी आहे. नाना पटोले यांची नाराजी दूर करतो. भाजपचे लोक टपलेले आहेत. माझा कुठलाही उद्देश भाजप यांना फोडून घेऊन जाणार असा नाही. देवेंद्र फडणवीस आणि भाजप मजबूत करण्यासाठी किती लोकांना फोडतात हे माहीत आहे. नाना पटोले यांचे मन दुखावले असल्याने,मी दिलगिरी व्यक्त करतो. 22 आमदार फुटणार हे वक्तव्य मी मागे घेतो. 22 आमदार फुटणार हे बोललो नसून मागील बाब सांगितली. सर्वांनी सावध राहायला हवे. महाविकास आघाडीत नाराजी नको म्हणून वक्तव्य मागे घेतो. असे खैरे यावेळी बोलताना म्हणाले.
काय म्हणाले होते चंद्रकांत खैरे?
औरंगाबाद येथे आयोजित करण्यात आलेल्या शिवसेनेच्या बैठकीत बोलतांना खैरे म्हणाले होते की, लवकरच शिंदे गटाचे 16 आमदार अपात्र होण्याची शक्यता आहे. तसे झाल्यास शिंदे-फडणवीस सरकार पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेसचे 22 आमदार तयार ठेवले असल्याचे विधान खैरे यांनी केले होते.