साताऱ्यात केंद्रीय विद्यालय स्थापनेसाठी उदयनराजेंनी दिलं शिक्षण मंत्र्यांना निवेदन
Satara central school : सातारा येथे केंद्रीय विद्यालयाची निमिर्ती होण्याकरता आम्ही आग्रही आहोत, त्यामुळे येणाऱ्या शैक्षणिक वर्षापासून केंद्रीय विद्यालय स्थापन करुन कार्यान्वित होणेबाबतच्या उपाययोजना तातडीने व्हाव्यात. या आशयाचे निवेदन केंद्रीय शिक्षा मंत्री धर्मेंद्र प्रधान यांना खासदार उदयनराजे भोसले यांनी भेटून दिले. (central school in Satara Udayanraje gave a statement to Union Education Minister Dharmendra Pradhan)
देशसेवा बजावणारे जवान, रेल्वे, पोस्ट यांसारख्या केंद्रीय तसेच राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या मुलांना दर्जेदार शिक्षण मिळण्यासाठी केंद्रीय विद्यालय, सातारा येथे होणे अत्यंत गरजेचे आहे. केंद्रशासनाच्या बदली कर्मचाऱ्यांची आणि सैनिकांची संख्या जिल्ह्यात मोठी आहे. सातारा ही मराठा साम्राज्याची तत्कालीन राजधानी होती. या भुमीला जाज्वल्य सैनिक परंपरा लाभली असल्याचे उदयनराजेंनी सांगितले.
सातारा येथे केंद्रीय विद्यालय स्थापन करुन कार्यान्वित करण्यासाठी आवश्यक इतकी 5 एकर जागा उपलब्ध आहे. सातारा येथे केंद्रीय विद्यालय व्हावे म्हणून आम्ही मागणी केली आहे. सातारा जिल्ह्यात केंद्रशासनाचे नोकरीत बदली होणाऱ्या पदावरील कर्मचाऱ्यांची संख्या मोठी आहे. सशस्त्रदलातील जवान, केंद्रीय कर्मचारी इत्यादींच्या मुलांना समान शैक्षणिक धोरण असणाऱ्या विद्यालयातुन शिक्षण मिळावे, जेणे करून पालकांची बदली झाल्यावर, शैक्षणिक धोरणांतील बदलांमुळे पाल्यांच्या शैक्षणिक प्रगतीमध्ये अडथळे येवू नयेत इत्यादी कारणांकरता केंद्रीय विद्यालय संघटन मार्फत, केंद्रीय विद्यालयांची स्थापना केली जाते.
भारतीय सशस्त्र दलातील तसेच केंद्रीय आणि राज्य कर्मचारी, कर्मचाऱ्यांची जेथे बदली होईल त्या ठिकाणच्या केंद्रीय विद्यालयात अश्या कर्मचाऱ्यांच्या पाल्यांना प्राधान्याने प्रवेश दिला जातो. सातारा जिल्ह्यात केंद्रीय विद्यालयाकरता आवश्यक असलेल्या निकषाइतकी बदलीपात्र पदावरील केंद्रीय व राज्य कर्मचाऱ्यांची संख्या आहे. केंद्रीय विद्यालय नसल्याने जिल्ह्यातील कर्मचाऱ्यांना इतर जिल्ह्यातील केंद्रीय विद्यालयात प्रवेशासाठी जावे लागत आहे. या सर्व बाबींचा विचार करताना सातारा जिल्ह्याकरता सातारा येथे केंद्रीय विद्यालय होणे अत्यावश्यक आहे. त्यासाठी लागेल त्या सुविधा आमच्या तसेच जिल्हाप्रशासनाच्या माध्यमातून उपलब्ध करुन दिल्या जातील.
येत्या जुन 2023 च्या शैक्षणिक वर्षापासून केंद्रीय विद्यालयाची सुरुवात व्हावी असे आमचे धोरण आहे. त्याकरता तातडीने केंद्रीय विद्यालयास मंजूरी प्रदान करून विद्यालय उभारणीस आवश्यक असलेला निधी तसेच स्टाफिंग पॅटर्न मंजूर करणे इत्यादीबाबत लवकर निर्णय घेण्यात यावा अशी अपेक्षा देखील यावेळी धर्मेंद्र प्रधान यांच्याकडे उदयनराजेंनी व्यक्त केली. आपल्या केंद्रीय विद्यालयाच्या उभारणीबाबत लवकरच ठोस निर्णय घेतला जाईल अशी ग्वाही यावेळी धर्मेद्र प्रधान यांनी दिली.