नारायण राणेंचे उद्धव ठाकरेंना जोरदार प्रत्युत्तर; म्हणाले, भाजप पक्ष चोरबाजार, तर...
राज्यात सध्या प्रचंड राजकीय गोंधळ सुरु आहे. अशातच काही दिवसांपूर्वी शिवसेना (ठाकरे गट) उद्धव ठाकरे यांनी बुलढाण्यातील चिखली येथे झालेल्या शेतकरी मेळाव्यात शिंदे गटासह भाजपवर जोरदार हल्लाबोल केला होता. त्यावेळी उद्धव ठाकरेंनी भाजप हा चोर पक्ष झाला आहे. असे विधान केले होते. त्यावरच आता केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे.
आज माध्यमांशी बोलताना नारायण राणे म्हणाले की, उद्धव ठाकरे यांचे बुलढाण्यातील भाषण माझ्याकडे आहे. भाजप हा पक्ष आहे की चोरबाजार? आता चोर म्हणत आहेत. त्यांच्याबरोबर अनेक वर्ष संसार केला ना? अनेक वर्ष सोबत होते ना? पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचं नाव वापरुन मोठे झालात ना, भाजपचा हात धरुन सत्तेत आलात ना, आणि नंतर शरद पवारांसोबत अडीच वर्ष होते ना? तेव्हा नाही वाटले चोर? असे सवालही राणे यांनी उपस्थित करत ठाकरेंवर हल्लाबोल केला. तुम्ही अडीच वर्षात किती चोरी केली ते जरा असे देखील आव्हान नारायण राणे यांनी उद्धव ठाकरेंना दिले आहे.
पुढे ते म्हणाले, उध्दव ठाकरे मुख्यमंत्री असताना कितीदा मंत्रालयात गेले असा सवाल करत ते मुख्यमंत्र्याच्या खुर्चीवर बसण्यासाठी अडीच वर्षात फक्त अडीच तास मंत्रालयात गेले. उध्दव ठाकरे आणि प्रशासन जमत नाही, उध्दव ठाकरे आणि आंदोलनं जमत नाही असा आरोप देखील राणे यांनी यावेळी केला. त्यांचे शिवसेनेत काही योगदान नाही. ठाकरे कधीही आंदोलनात गेले नाहीत असा आरोप देखील त्यांनी यावेळी केला.कोरोना काळात उध्दव ठाकरे हे मातोश्रीच्या पिंजर्यात गप्प बसून राहिले. त्या कालावधीत ठाकरेंनी फक्त पैसे खाण्याचे काम केले. कधी त्यांनी कुणा कार्यकर्त्याचं घर बसवलंय की कुणा गोरगरीबाला मदत केली अशा शब्दांत राणे यांनी ठाकरेंवर निशाणा साधला.