बाळासाहेब ठाकरेंची पार्टी शरद पवारांच्या पायात नेऊन ठेवली; पवार- ठाकरेंवर शाहांचा निशाणा
राज्यात सध्या प्रचंड राजकीय गदारोळ निर्माण झाला आहे. त्यातच दुसरीकडे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. त्यातच अमित शाह यांनी कोल्हापूर येथे एका कार्यक्रमाला हजेरी लावली. या कार्यक्रमात कार्यकर्त्यांना संबोधित करताना राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार व ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली. उद्धव ठाकरेंनी बाळासाहेब ठाकरेंची पार्टी शरद पवारांच्या पायात नेऊन ठेवली, अशी टीका अमित शाह यांनी केली.
नेमकं काय म्हणाले उद्धव ठाकरे?
कोल्हापूरमध्ये बोलत असताना अमित शाह म्हणाले की, २०१९ मध्ये आपण देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढलो होतो. निवडणुकीच्या प्रचारात नरेंद्र मोदींचा मोठा फोटो लावला होता. तर उद्धव ठाकरे यांचा लहान फोटो लावला होता. देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढत आहोत, मी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाही अनेक ठिकाणी हेच बोललो होतो. पण निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर त्यांच्या (उद्धव ठाकरे) तोंडाला पाणी सुटले. त्यांनी आपल्या सर्व सिद्धांतांना मूठमाती देऊन त्यांनी पक्ष शरद पवारांच्या पायाजवळ नेऊन ठेवला. अशा शब्दात त्यांनी शरद पवार आणि उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला.
पुढे ते म्हणाले की, भाजपाला सर्वाधिक जागा मिळाल्या होत्या. त्यामुळे मुख्यमंत्री आमचाच बनायला हवा होता. आम्हाला सत्तेचा लोभ नाही. आम्ही सत्तेसाठी सिद्धांतांचा बळी दिला नाही. उद्धव ठाकरेंमुळे हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांची पार्टी शरद पवारांच्या पायात जाऊन बसली होती. पण आता काळ बदलला आहे. खरी शिवसेना धनुष्यबाणासह भाजपाबरोबर आली आहे. आज एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री बनवण्याचं काम भारतीय जनता पार्टीने केलं आहे. आज त्यांना धडा शिकवण्याचं कामही झाले. अशी देखील टीका यावेळी शाह यांनी उद्धव ठाकरेंवर केली.