ठरलं! 'या' तारखेला अमित शाह घेणार महाराष्ट्र आणि कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांची भेट
राज्यात एकीकडे राजकीय घडामोडी तीव्र झालेल्या असताना, कर्नाटक सरकारने महारष्ट्रातील काही गावांवर दावा केल्यानंतर राजकीय वर्तुळात एकच गदारोळ सुरु झाला. त्यानंतर दोन्ही राज्यात या विषयावरून घमासान पाहायला मिळाले. या वादात कर्नाटकमध्ये महाराष्ट्रातील काही गाड्यांच्या तोडफोड झाल्यामुळे राज्यातील विरोधक आणखीच आक्रमक झाले. विरोधकांच्या प्रतिक्रिया येत असताना हा वाद लवकरत लवकर केंद्र सरकारकडून मिटवण्यात यावी अशी मागणी देखील करण्यात आली. त्यानतंर आता केंद्रीय मंत्री अमित शाह दोन्ही राज्याच्या मुख्यमंत्र्यांची भेट घेणार आहे अशी माहिती समोर आली आहे.
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादात मध्यस्थी करणार आहेत. येत्या 14 डिसेंबरला अमित शाह महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांची भेट घेणार आहेत.भेटीबाबत राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे माध्यमांना माहिती दिली. सीमावादाच्या मुद्द्यावर तसेच छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अवमानजनक वक्तव्य केले म्हणून राज्यपाल भगतसिंह कोश्यारींना पदावरून हटवावे, या मागणीसाठी राज्यातील खासदारांनी आज केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली. त्यानंतर सुप्रिया सुळे यांनी ही माहिती दिली आहे.