Rupali Chakankar: EVM मशीनची पूजा केल्याप्रकरणी रुपाली चाकणकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल
राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर या आज म्हणजेच 7 मे रोजी खडकवासला परिसरातील एका मतदान केंद्रावर पोहचल्या. मतदान सुरु होण्यापूर्वी त्या औक्षण करण्याचे ताट घेऊन मतदान केंद्रात दाखल झाल्या. त्यानंतर त्यांनी मतदान केंद्रात इव्हीएम मशीनची पूजा केली. त्यामुळे निवडणूक अधिकाऱ्यानेच त्यांच्याविरोधात तक्रार केली असून रुपाली चाकणकर यांच्यावर सिंहगड पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या सर्व प्रकाराची सोशल मीडियावर एकच चर्चा रंगली आहे. ईव्हीएम मशीनची पूजा करतानाचा रुपाली चाकणकर यांचा फोटो राज्यभर एकदम व्हायरल झाला. त्यावरुन समाज माध्यमावर उलटसुलट चर्चा सुरु आहेत. तिसऱ्या टप्प्यात अजित पवारांचा डायलॉग, सुप्रिया सुळे यांचे अजित पवारांच्या घरी जाणे आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या नेत्या रुपाली चाकणकर यांची ईव्हीएम पूजा यांनी सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे.
मतदानासाठी चाकणकर या ताट आणि दिवा कशाला घेऊन आल्या असतील असा प्रश्न उपस्थित सर्वांनाच पडला होता. मतदान केंद्रावरील अधिकारी पण चक्रावले होते. अशाप्रकारे मतदान केंद्रात जाऊन पूजा करणे हे निवडणूक आयोगाच्या नियमात बसत नसल्याने अधिकाऱ्यानेच याप्रकरणी तक्रार दिली.