आदित्य ठाकरेंची दहीहंडी आशिष शेलार फोडणार
मुंबई : भाजप नेते आशिष शेलार भाजप प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी स्वीकारताच अॅक्शन मोडमध्ये आले आहेत. शेलारांनी आदित्य ठाकरेंच्या मतदारसंघावर लक्ष केंद्रीत केले आहे. आदित्य ठकरेंच्या वरळी मतदारसंघात भाजपाने भव्य दहीहंडीचे आयोजन केले आहे. यामुळे शिवसेनेला दहीहंडीसाठी दुसऱ्या मैदानाचा शोध घ्यावा लागत आहे.
भाजप नेते चंद्रकांत पाटील मंत्रिमंडळात सामील झाल्यानंतर भाजपच्या प्रदेध्यक्षपदी आशिष शेलारांची नियुक्ती झाली. यानंतर त्यांनी थेट आदित्य ठाकरेंच्या मतदारसंघात आपले लक्ष केंद्रीत केले आहे. आदित्य ठाकरेंच्या वरळी मतदारसंघातील जांबोरी मैदानात भाजपा दहीहंडी आयोजित करणार आहेत. महत्वाचे म्हणजे वरळी मतदारसंघात शिवसेनेचे तीन आमदार आणि नगरसेवक असूनही भाजपाने दहीहंडीचे आयोजन केले आहे. यामुळे आता शिवसेनेला दुसरे मैदान शोधण्याची नामुष्की आली आहे.
एकनाथ शिंदे यांच्या बंडाळीमुळे शिवसेनेत उभी फुट पडली आहे. यामुळे शिवसेनेचे डॅमेज कंट्रोल करण्यासाठी आदित्य ठाकरे मैदानात उतरले आहेत. सध्या ते महाराष्ट्र दौऱ्यावर असून शिवसैनिकांच्या भेटीगाठी घेत आहेत. अशात आदित्य ठाकरेंचे आपला वरळी मतदार संघाकडे दुर्लक्ष झाले का, असा प्रश्न सर्वांना पडला आहे. तर, दुसरीकडे आगामी निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून आशिष शेलारांनी कंबर कसली असून त्याची सुरुवात आदित्य ठाकरेंच्याच मतदारसंघापासून केली आहे.