भाजप खासदाराची शिंदे गटाच्या आमदारावर सडकून टीका; सत्तेला नमस्कार घालणारे...
संजय देसाई | सांगली : राज्यामध्ये शिवसेना (शिंदे गट) आणि भाजपा हे एकत्रित सत्तेत आहेत. परंतु, सांगली जिल्ह्यात मात्र भाजपाचे खासदार संजय पाटील आणि शिवसेनेचे शिंदे गटाचे आमदार अनिल बाबर यांच्यात संघर्ष वाढत आहे. सत्तेला नमस्कार घालणारे आम्ही नाही, असा सणसणीत टोला संजय पाटील यांनी अनिल बाबर यांना लगावला आहे.
तसेच सातबारावर कर्ज काढून तुम्ही टेंभू योजना पूर्ण केली नाही, अशी टीकाही खासदार संजय पाटलांनी केली आहे. सांगलीच्या खानापूर तालुक्यातील हिंगणगादे येथे एक कार्यक्रम आयोजित केला होता. यावेळी ते बोलत होते.
सांगलीच्या खानापूर आटपाडी तालुक्यातील टेंभू योजनेच्या श्रेयवादातून भाजपा खासदार संजय पाटील आणि शिवसेना शिंदे गटाचे आमदार अनिल बाबर यांच्यात संघर्ष सुरू झाला आहे. आमदार अनिल बाबर हे आपणच टेंभू योजनेचे जनक आणि योजना पूर्ण केल्याचा आव आणत असल्याचा आरोप तालुक्यातल्या विरोधकांकडून करण्यात येतो आहे. याच मुद्द्यावरून संजय पाटील यांनी आमदार अनिल बाबर यांचा खरपूस समाचार घेतला आहे.
खानापूरच्या हिंगणगादे या ठिकाणी आयोजित कार्यक्रमात बोलताना खासदार संजय पाटील म्हणाले, सत्तेला नमस्कार करणारे आम्ही नाही, संघर्ष आमच्या रक्तात आहे. तसेच, टेंभूचे पाणी काय स्वतःच्या सातबारावर कर्ज काढून आणले आहे काय? असा खडा सवाल करत तुम्ही जेष्ठ आहात, आम्ही तुमचा आदर करतो पण कुणाला तरी बघून घेतो, कुणाला तरी इन्कम टॅक्स लावतो, कुणाला काय? हे चालणार नाही, असा इशारा त्यांनी शिवसेनेच्या अनिल बाबर यांना दिला. सत्तेला नमस्कार करणारे आम्ही नाही. संघर्ष आमच्या रक्तात आहे, असेही त्यांनी म्हंटले आहे.