भुजबळ हे खऱ्या अर्थाने राष्ट्रवादीतील ओवैसी, बावनकुळेंचा भुजबळांवर घणाघात
मागील दिवसांपूर्वी छगन भुजबळ यांनी “सर्व शाळांमध्ये महापुरुषांचे फोटो असावेत. फक्त तीन टक्के लोकांना शिकवून आम्हाला शिक्षणापासून दूर ठेवणाऱ्या सरस्वतीची पूजा कशासाठी करायची?” असे विधान केले होते. भुजबळांच्या त्या विधानांवर राज्यातील वातावरण प्रचंड तापलं होते. यावरूनच आता भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी भुजबळांवर विखारी टीका केली आहे.
भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी नागपूरमध्ये बोलत असताना म्हणाले की, शिंदे फडणवीस सरकारने सर्वच धर्माच्या सणांना निर्बंध मुक्त केले, त्यामुळे गेल्या वीस वर्षात उत्साहाने हे सण साजरे झाले नाही, तेवढा उत्साह यंदा आहे, छगन भुजबळ यांचे जे वक्तव्य आले होते सरस्वती मातेच्या संदर्भामध्ये छगन भुजबळ हे खऱ्या अर्थाने राष्ट्रवादी मधले ओवैसी आहेत. अश्या शब्दात त्यांनी भुजबळ यांना टोमणा मारला आहे.
नेमके काय म्हणाले छगन भुजबळ?
शाळांमध्ये फुले, आंबेडकर, शाहू, कर्मवीर भाऊराव पाटील यांचे फोटो लावले पाहिजेत. कारण त्यांनी शिक्षणाचा अधिकार दिला. परंतु, सरस्वतीचा फोटो, शारदा मातेचा फोटो लावतात. जिला आम्ही कधी पाहिलं नाही. जिने आम्हाला काही शिकवलं नाही. असेलच शिकवलं तर फक्त तीन टक्के लोकांना शिकवलं आणि आम्हाला दूर ठेवलं तर त्यांची पूजा कशासाठी करायची? असे वादग्रस्त वक्तव्य भुजबळ यांनी केले आहे. महापुरुषांच्या फोटोंकडे पाहत भुजबळ म्हणाले, मला काही कळत नाही. अरे ज्यांनी तुम्हाला दिलं ते हे सगळे इथे आहेत. यांच्यामुळेच तुम्हाला शिक्षण मिळालं. अधिकार मिळाले आणि सगळं मिळेल. यांची पूजा करा हे तुमचे देव असले पाहिजेत. यांना देव समजून यांची पूजा झाली पाहिजे. यांच्या विचारांची पूजा झाली पाहिजे, असे त्यांनी म्हंटले आहे.