महाविकास आघाडीच्या महामोर्चाविरोधात भाजपचे माफी मांगो आंदोलन; शेलारांची घोषणा
मुंबई : भाजपा नेत्यांनी महापुरुषांविषयी केलेली वक्तव्यांवरुन राजकारण चांगलेच तापले आहे. अशातच शिवसेना खासदार संजय राऊत यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जन्मस्थळाचा उल्लेख चुकीचा केल्याने भाजप आता आक्रमक झाली आहे. या पार्श्वभूमीवर संजय राऊतांना माफी मागावीच लागेल. काळे झेंडे घेऊन माफी मागो आंदोलन करणार असल्याची घोषणा भाजप नेते आशिष शेलारांनी केली. ते पत्रकार परिषदेत बोलत होते.
आशिष शेलार म्हणाले की, काल पाहिले ते आधीपासून महाराष्ट्र पाहत आहेत. ब्लू डार्टची कुरियर कॉपी दाखवतो. शिवसेना ठाकरे गटाचे प्रवक्ते संजय राऊत यांना २ पुस्तके कुरियर केली आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर आधारित राज्य शासनाने छापलेले व मुंबई महापालिकेने छापलेले अशी २ पुस्तके कुरियर केली. डॉ. बाबासाहेब यांची जीवन गाथा सांगणारी २ पुस्तके भाई गिरकर यांनी पाठवली आहेत. अपेक्षा आहेत ते वाचतील, असा टोला त्यांनी संजय राऊतांना लगावला आहे.
डॉ. बाबासाहेब यांच्या जन्मस्थळावरुन वाद निर्माण करण्याचा प्रयत्न सुरु आहे. आंबेडकर प्रेमी समस्त भारतवर्षावर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्मस्थळाचा वाद निर्माण करून अफगाणी संकट आणण्याचा प्रयत्न करत आहेत. आपले अज्ञान पाजळण्याची एकही संधी संजय राऊत सोडत नाही. डॉक्टर चांगली औषधे देतो की कंपाऊंडर यावर त्यांनी अक्कल पाजळली होती. आणि आता डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जन्मस्थळाबाबत वाद निर्माण करणे अक्षम्य चूक आहे, अशी घणाघाती टीका शेलारांनी केली आहे.
बाबासाहेबांबाबत इतके अज्ञान आहे. बाबासाहेबांनी संविधानाला जन्म दिला हे तरी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला मान्य आहे का? संविधान आणि स्वातंत्र्य उद्धव ठाकरेंमुळे मिळाले हे तर सांगायचे नाही ना नवीन इतिहास लिहिण्याचा प्रयत्न सुरु आहे. ज्या काँग्रेसने बाबासाहेबांचा निवडणुकीत पराभव केला, त्या काँग्रेस सोबत जाऊन शिवसेनेने बाबासाहेबांच्या जन्मस्थळाचा वाद निर्माण केला आहे. उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेची भूमिका स्पष्ट करावी, असा आरोप आशिष शेलारांनी शिवसेनेवर केला आहे.
सुषमा अंधारे यांनी प्रभू श्रीकृष्णाची खिल्ली, संत ज्ञानेश्वर, संत एकनाथांची चेष्टा, वारकरी संप्रदायाचा अपमान केला. हा महाराष्ट्र द्रोह नाही का? हिंदु देवदेवतांचा अपमान केल्यावर उद्धव ठाकरे तुम्ही मौन सोडायला तयार नाही. मोर्चे कसले डोंबलाचे काढता, असा सवाल विचारत आशिष शेलार म्हणाले, लोकांमध्ये असंतोष आहे. भाजप हे सहन करणार नाही. एखाद्या फिल्मच्या डायरेक्टरला युक्त्या सुचणार नाहीत, अशा युक्त्या महाविकास आघाडीला सुचत आहेत. मोर्चाला प्रसिद्धी मिळत नसल्याने परवानगी मिळत नसल्याचा कांगावा करण्यात येत आहे, अशीही टीका त्यांनी केली आहे.
संजय राऊत हे सर्वज्ञानी आहेत. तुम्हाला माफी मागावीच लागेल. काळे झेंडे घेऊन माफी मागो आंदोलन करणार असून मुंबईतील ६ लोकसभा मतदारसंघात तीव्र निदर्शने करण्यात येतील. भाजपाचे आंदोलन लोकशाही मार्गाने असेल, अशी घोषणा आशिष शेलारांनी यावेळी केली.
संजय राऊत हे आजपर्यंत अहंकारात अधोगतीला गेलेत. माझे मित्र म्हणून मी त्यांनी आणखी खोलात जाऊ नये अशी माझी इच्छा आहे. अग्रलेखात ते जे लिहत आहेत. मग नक्षलवादाचे समर्थन करणे हे शहाणपणाचे लक्षण आहे का? राऊतांनी स्वत:लाच कळतं ते शहाणपण हा अहंकार बाजूला ठेवा आणि अधिक शिक्षणासाठी रामभाऊ म्हाळगीत जावे, असा सल्लादेखील शेलारांनी संजय राऊतांना दिला आहे.