मी काही हतबल झालेलो नाही, आम्ही हातात बांगड्या घातलेल्या नाहीत- उदयनराजे भोसले
राज्यात एकीकडे राजकीय गोंधळ सुरु असताना अशातच राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल केलेल्या वादग्रस्त विधानावरुन अद्यापही वाद कमी झाला नाही. त्यावरच बोलताना खासदार उदयनराजे भोसले पुन्हा एकदा आक्रमक झाले. दोन दिवसांपूर्वी उदयनराजे यांनी पत्रकार परिषद घेतली होती तेव्हा ते भावूक झाले होते. त्यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उदयनराजे यांच्या भावना समजू शकतो. छत्रपतींचे वंशज हतबल होऊ शकत नाहीत, असं विधान केलं होतं. त्यावरच आता उदयनराजे भोसले यांनी इशारा दिला आहे.
काय म्हणाले उदयनराजे भोसले?
“परवाच्या दिवशी मला गहिवरुन आलं ते कशामुळे आलं? मी काही हतबल झालेलो नाही. आम्ही हातात बांगड्या घातलेल्या नाहीत. वेळप्रसंगी काय करायचं ते आम्ही ठरवू”, “पण लोकांनी विचार करायला पाहिजे ना. लाज वाटली पाहिजे, एवढं सगळं होत असताना स्पष्ट भूमिका मांडली पाहिजे. तुम्ही लोकशाहीच्या चार स्तंभातील महत्त्वाचे घटक आहात. तुम्ही त्या लोकांना प्रश्न विचारले पाहिजेत”, असं उदयनराजे म्हणाले.
पुढे ते म्हणाले की, “राज्यपाल राज्याचा प्रमुख असतो. त्यांनीपण असे विधान करायचे? उद्या आणखी कोणी मोठ्या पदावरचा करेल. तुम्ही खपवून घेणार आहात का?”, दोन डोळे माझे आहेत तसे प्रत्येकाचे आहेत. पण संपूर्ण समाज आपल्याकडे बघत असतो. क्षणभर सत्तेत राहण्यासाठी सत्तांतर, मी याला फारसा महत्त्व देत नाही. तुमची भूमिका स्पष्ट करणार आहात की नाही?”, “पुढच्या पिढीला आपण काय सांगणार? हे एक मोठं प्रश्नचिन्ह आहे. हे लोकं आज कशासाठी अशाप्रकारे वागतात ते मला माहिती नाही. हळूहळू लोकांना वाटेल की ही फॅशन आहे. ही प्रथाच पडेल. लोकं म्हणतील हे गैर नाहीय. गैर नाहीय म्हणजे? अहो नाव घेऊ नका ना”, असं उदयनराजे भोसले म्हणाले.
“ज्या व्यक्तीने संपूर्ण स्त्रियांचा, वडिलधाऱ्यांचा, प्रत्येक धर्मातील नागरिकांचा, धर्मस्थळांचा सगळ्यांचा सन्मान केला, आज त्यांचाच लेखणी, सिनेमा, वक्तव्यातून अपमान करतंय. हे आज नाही तर चालत आलेलं आहे. आपण सगळ्यांनी गप्प बसायचं का?” जेवढे आमदार असतील, तुम्ही कुठल्याही पक्षाचे असाल, याच राजकारण आणण्याचं कारणच नाही. शिवरायांचं तुम्ही जेव्हा नाव घेता, प्रत्येक चळवळ चालू झाल्या त्यांचं मूळ प्रेरणास्थान छत्रपती शिवाजी महाराज होते”, असं उदयनराजे म्हणाले.