अखेर सत्यजित तांबेंना भाजपचा पाठिंबा; विखे पाटलांनी दिली महत्त्वाची माहिती
राज्यात एकीकडे प्रचंड राजकीय गोंधळ सुरु आहे. त्यातच दुसरीकडे शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीमुळे राजकीय वातावरण चांगलेच तापलेले दिसत आहे. राज्यातील पाच जागांसाठी ही निवडणूक होत आहे. परंतु, नाशिक पदवीधर मतदारसंघ या निवडणुकीत केंद्रस्थानी आला आहे. या जागेसाठी युवक काँग्रेसचे अध्यक्ष राहिलेल्या सत्यजित तांबे यांनी बंडखोरी करत अपक्ष म्हणून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. परंतु, दुसरीकडे भाजपने या ठिकाणी उमेदवार दिलेला नव्हता. त्यामुळे हा सर्व भाजपचा खेळ आहे. असे काँग्रेसकडून सांगण्यात येत होते. परंतु, अद्यापही भाजप तांबे यांना पाठिंबा देण्याचे जाहीर केले नाही. त्यातच आता भाजप नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी मोठे विधान केले आहे.
आज माध्यमांशी बोलताना विखे पाटील यांनी महत्वाची माहिती दिली. विधान परिषदेच्या नाशिक पदवीधर मतदारसंघासाठी भाजपाने अपक्ष उमेदवार सत्यजित तांबे यांना पाठिंबा दिला आहे. स्थानिक कार्यकर्त्यांच्या पातळीवर हा निर्णय झाल्याचेही त्यांनी सांगतिले. ते म्हणाले की, आमच्या सर्व कार्यकर्त्यांनी सत्यजित तांबे यांना मतदान करण्याचा निर्णय घेतला आहे. हा निर्णय कार्यकर्त्यांच्या पातळीवर झालेला आहे. सत्यजित तांबे तरुण आहेत. होतकरू आहेत. त्यांना संधी दिली पाहिजे. म्हणूनच आमच्या कार्यकर्त्यांनी हा निर्णय घेतलेला आहे. सत्यजित तांबे यांना मतदान करण्याचे आवाहन करण्यास सुरुवात करण्यात आली आहे. असे देखील त्यांनी स्पष्टपणे सांगितले.