सत्यजित तांबेंना पाठींबा देण्याबाबत बावनकुळेंचे महत्वाचे विधान; म्हणाले, नावाचाच विचार...
राज्यात सध्या प्रचंड राजकीय खलबत सुरु आहे. तर दुसरीकडे राज्यात विधान परिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघांतील पाच जागांसाठी निवडणूका जाहीर झाल्या आहेत. या निवडणुकीसाठी सर्वच पक्षाची जोरदार तयारी सुरु आहे. त्यातच नाशिकच्या जागेबाबत मोठा पेच निर्माण झाला होता. काँग्रेसने विद्यमान आमदार सत्यजीत तांबे यांच्याऐवजी त्यांचे डॉ. सुधीर तांबे यांना उमेदवारी जाहीर केली आहे. मात्र, अर्ज दाखल करताना ऐनवेळी काँग्रेसने सत्यजीत तांबे यांचा उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यामुळे ही निवडणूक रंजक बनली आहे. त्यावरच आता भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी सत्यजित तांबे यांना पाठींबा देण्याबाबत मोठे व्यक्तव्य केले आहे.
काय म्हणाले बावनकुळे?
भाजपातर्फे राजेंद्र विखे पाटील यांच्या नावाचाच विचार आम्ही करत होतो. राधाकृष्ण विखे पाटील यांनीच त्यासाठी पुढाकार घेतला होता. पण मागच्या सहा महिन्यांपूर्वी उमेदवारी जाहीर झाली असती तर तयारीला वेळ मिळाला असता, अशी भूमिका राजेंद्र विखे पाटील यांनी मांडली आणि निवडणूक लढविण्यास असमर्थता दर्शविली. आता आम्हाला दिसतंय की, ही अपक्ष निवडणूक होईल. भाजपाने अजून कुणालाही एबी फॉर्म दिलेला नाही. त्यामुळे सत्यजीत तांबे यांनी भाजपाकडे पाठिंबा मागितल्यास विचार करु. असे देखील बावनकुळे यांनी यावेळी बोलताना स्पष्ट केले.
पुढे ते म्हणाले की, देशात आणि राज्यात दिल्लीपासून गल्लीपर्यंत आमचे सरकार असले तरी काही ठिकाणी आम्ही कमजोर आहोत. हे मान्य करतो. सहकार क्षेत्र, शिक्षक मतदारसंघ यात आम्ही कमजोर आहोत. राजकारणात एक आणि एक अकरा झाले पाहीजेत. तिथे एक आणि एक दोन होत नाही. ज्याठिकाणी आम्ही नाही आहोत, तिथे स्पेश निर्माण करण्यााचा प्रयत्न आम्ही करणारच. नागपूरमध्ये आमचा उमेदवार होता म्हणून आम्ही तिथे दिला. ज्याठिकाणी आम्ही कमजोर आहोत, त्याठिकाणी एक आणि एक अकरा करावेच लागते. असे माध्यमांना बोलताना बावनकुळे म्हणाले.