भीक म्हणजे वर्गणी, देणगी; पाटलांकडुन वक्तव्याचे समर्थन
राज्यात अभूतपूर्व गोंधळ सुरु आहे. त्यातच राजकीय मंडळींकडून वादग्रस्त विधानांचे सत्र सुरु आहे. राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल विधान त्यासोबतच अनेक भाजपच्या नेत्यांनी देखील वादग्रस्त विधान केले होते. हा वाद अद्यापही शांत झालेला नाही. त्याच पार्श्वभूमीवर भाजप मंत्री चंद्रकांत पाटील यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले आणि कर्मवीर भाऊराव पाटील यांच्याबद्दल वादग्रस्त विधान केले आहे. त्यावर विरोधक आक्रमक झालेले असताना पाटील यांनी तात्काळ पत्रकार परिषद घेत वक्तव्याचे समर्थन केले आहे.
मी जे काही आज मांडलं त्याची प्रचंड वाहवाह वारकरांमध्ये
वादग्रस्त विधानावर बोलताना चंद्रकांत पाटील म्हणाले की, मला असं वाटत की तुमच्या माध्यमातून मी सांगण्यापेक्षा लाईव्ह सगळ्या तुमच्या दर्शकांनी पहिले असेल. मी त्यांच्या विषयी आदरच व्यक्त केला. शाळा कोणी सुरु केल्या बाबासाहेबांनी सुरु केल्या, महात्मा फुलेंनी केल्या, कर्मवीर भाऊराव पाटील यांनी सुरु केल्या. या शाळा सुरु करताना ते कुठल्याही सरकारी अनुदानावर अवलंबून नाही राहिले. त्यांनी लोकांकडे भीक मागितली.
भीक म्हणजे काय आताच्या भाषेत सीएसआर(CSR) म्हणू, वर्गणी म्हणू, देणगी म्हणू आपण साधारण म्हणतो मी दारोदारी भीक मागितली आणि माझी संस्था वाढवली. मी जे काही आज मांडलं त्याची प्रचंड वाहवाह वारकरांमध्ये आहे. जर आपल्याला संत विद्यापीठ सुरु करायचे तर सरकारवर कशाला अवलंबून राहायचे खूप लोक आहे देणारे त्यावेळी मी ते म्हणालो. आता प्रत्येक गोष्टीला शेंडा नाही बुडका नसताना वाद निर्माण करण्याचा प्रयत्न सुरु आहे.असे चंद्रकांत पाटील यावेळी म्हणाले.
नेमकं काय म्हणाले चंद्रकांत पाटील?
पैठण येथील कार्यक्रमात बोलत असताना चंद्रकांत पाटील म्हणाले की, त्या काळात सरकार शाळांसाठी अनुदान देत नव्हते. तरीसुद्धा महापुरुषांना शाळा उघडल्या केल्या. मात्र, आता लोकं शाळांच्या अनुदानासाठी सरकारवर अवलंबून राहतात. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले आणि कर्मवीर भाऊराव पाटील यांनी शाळा सुरू केल्या. या शाळा सुरू करताना सरकारनं त्यांना अनुदान दिलं नाही. त्यांनी लोकांकडं भीक मागितली. असं म्हणताना चंद्रकांत पाटील यांनी गळ्यातलं मफलर पुढे केले. ते म्हणायचे मला पैसे द्या. त्या काळात दहा रुपये देणारे होते. आता दहा कोटी रुपये देणारे आहेत. सीएसआरच्या माध्यमातून कंपन्यांच्या नफ्यातून दोन टक्के खर्च करण्यासाठी कायदा झाला आहे. असे चंद्रकांत पाटील म्हणाले होते.