भारत जोडो यात्रेत सहभागी झालेल्या संजय राऊतांवर शेलारांची बोचरी टीका; तेव्हा प्रभादेवीच्या गल्लीत...
काँग्रेसची भारत जोडो यात्रा सध्या जम्मूत पोहचली आहे. त्यातच या भारत जोडो यात्रेत सहभागी होण्यासाठी शिवसेना ठाकरे गट नेते संजय राऊत जम्मूत आज आले आहेत. ते पहिल्यांदाच भारत जोडो यात्रेतही सहभागी झाले. यावरच आता भाजप मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांनी टीका केली आहे.
काय म्हणाले संजय राऊत?
आशिष शेलार यांनी ट्विटरच्या माध्यमातून संजय राऊत यांच्यावर निशाणा साधला आहे. ते म्हणाले की, देव, देश आणि धर्माच्या संघर्षातून गायब असलेले खासदार संजय राऊत, काँग्रेसच्या युवराजांसोबत चालायला गेले! याच संगतीमुळे सरकार गेले, खासदार, आमदार गेले, पक्षाची शकले उडाली.. “याच भल्या” कामाचा झेंडा तुम्ही घेऊन निघालाच आहात, तर तू चाल पुढं तुला र गड्या भीती कशाची! असं आशिष शेलार म्हणाले.
दुसऱ्या ट्विटमध्ये ते म्हणाले की, हिंदुत्वासाठी राम जन्मभूमीचा लढा जेव्हा लाखो कारसेवक लढत होते, तेव्हा संजय राऊत प्रभादेवीच्या गल्लीत बसून होते. 370 कलम मुक्त काश्मीर व्हावे यासाठी असंख्य जण संघर्ष करीत होते, बलिदान देत होते, तेव्हा संजय राऊत मुंबईत बसून मीडियात “ध्वनी प्रदूषण” करीत होते. अशी टीका त्यांनी यावेळी केली आहे.