'...तर तुम्ही खोलीत बसला होतात' अनुराग ठाकूर यांचे उद्धव ठाकरेंना प्रत्युत्तर
सोमवारी 19 जून रोजी शिवसेनेचा वर्धापन दिन पार पडला. बंडखोरीनंतर शिवसेनेचा हा पहिला वर्धापन होता. त्यामुळे ठाकरे गट आणि शिंदे गट या दोन्ही गटाने वर्धापन दिनाच्या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. त्यातच ठाकरे गटाच्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात बोलताना ठाकरे गट पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि शिंदे गटावर जोरदार हल्ला चढवला होता. यावेळी ठाकरेंनी मणिपूर हिंसाचारावरून मोदींवर सडकून टीका केली होती. त्यावरच भाजपकडून प्रत्युत्तर येत असताना आता बोलताना केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी उद्धव ठाकरेंवर खोचक शब्दांत टीका केली आहे.
काय म्हणाले अनुराग ठाकूर?
मुंबईत माध्यमांशी बोलताना अनुराग ठाकूर यांनी उद्धव ठाकरेंच्या टीकेला प्रत्युत्तर दिले आहे. 'अडीच वर्षं जो व्यक्ती आपल्या घरातच बंद राहिला, आपल्या कार्यकर्त्यांनाही भेटला नाही, जो कोरोनाच्या भीतीने आपल्या घरातून बाहेरच पडला नाही, त्यांना सत्तेतून बाहेर करण्याचे काम त्यांच्याच कार्यकर्त्यांनी केले. जनतेने केले. त्यांनी आपल्या विचारच्या लोकांना सोडून वेगळ्या विचारसरणीच्या लोकांना जवळ केले. त्या विचाराला बाळासाहेब ठाकरेंचा नेहमीच विरोध होता. त्यामुळे हा दिवस तर त्यांना बघायचाच होता. आता पश्चात्ताप करून काय फायदा?' असा सवाल त्यांनी यावेळी उपस्थितीत केला.
पुढे ते म्हणाले की, उद्धवजी ठाकरे, आता तरी सत्याचा सामना करा. सर्व जगाने मान्य केले की जगातल्या १६० देशांना औषध व लस पोहोचवण्याचे काम भारताने केले. देशात लसी मोफत देण्याचे काम मोदींनी केले आहे. शिवाय पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पुढाकाराने जेव्हा निधीची तरतूद केली गेली, आपल्या वैज्ञानिकांना प्रेरणा दिली गेली, तेव्हा कुठे ही लस तयार झाली. तेव्हा तर तुम्ही खोलीत बसला होतात. मुंबई आणि महाराष्ट्राच्या जनतेला विसरले होता. असा टोला त्यांनी ठाकरेंना लगावला.