शिंदे- फडणवीस यांच्या राज्यात दादागिरी कोणीही सहन करणार नाही, बावनकुळेंचा इशारा
भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे सध्या कोल्हापूर दौऱ्यावर आहेत. त्यावेळी त्यांनी स्थानिक पदाधिकाऱ्यांसह भेटीगाठी केल्या, त्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी त्या पत्रकार परिषेदत त्यांनी विरोधकांवर जोरदार निशाणा साधला आहे. राष्ट्रवादी नेते जितेंद्र आव्हाड यांच्या अटकेपासून तर काँग्रेसच्या भारत जोडो यात्रेवर बावनकुळे यांनी टीका केली आहे. चित्रपटगृहात जाऊन मारहाण करण्याची दादागिरी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या राज्यात कोणीही सहन करणार नाही," असा इशारा चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिला आहे.
काय म्हणाले बावनकुळे?
राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांना पोलिसांनी अटक केल्याविषयी एका पत्रकाराने प्रतिक्रिया विचारली. त्यावर त्यांनी उत्तर देतांना बावनकुळे म्हणाले की, "कायद्यापेक्षा कोणीही मोठा नाही. एखाद्या चित्रपटात काही आक्षेपार्ह असेल तर त्याच्या विरोधात सेन्सॉर बोर्डाकडे तक्रार करावी. विरोध करण्यासाठी शांततामय मार्गाने धरणे देता येते, निदर्शने करता येतात किंवा उपोषण करता येते. पण सीसीटीव्ही चित्रिकरण चालू असूनही थिएटरमध्ये जाऊन कोणी लोकांना मारहाण करेल आणि महिलांचा अपमान करेल तर दादागिरी खपवून घेणार नाही. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या राज्यात हे कोणीही सहन करणार नाही," असा इशारा त्यांनी वेळी दिला आहे.
भारत जोडो यात्रेवर टीका आणि उद्धव ठाकरेंना टोला
‘‘काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांना स्थिरस्थावर करण्यासाठी महाविकास आघाडी सरकार बनवण्यात आले होते. त्यामुळे सत्तेत असूनही काँग्रेस-राष्ट्रवादीच्या सामान्य कार्यकर्त्याला काहीच मिळाले नाही. भारत जोडो यात्रा देखील नेत्यांनी हायजॅक केली. म्हणूनच काँग्रेस-राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड मोठी अस्वस्थता आहे. एका बाजूला राज्यात भारत जोडो यात्रा सुरू असताना मोठ्या प्रमाणात काँग्रेसचे कार्यकर्ते भाजपमध्ये प्रवेश करत आहेत.काँग्रेसच्या बाराशे कार्यकर्त्यांनी काल सातारा येथे भाजपामध्ये प्रवेश केला. गेल्या आठवड्यात नंदूरबार जिल्ह्यातील काँग्रेसचे तीन नगरसेवक भाजपामध्ये दाखल झाले. राहुल गांधी यांची यात्रा काँग्रेसचे नेते आणि त्यांच्या मुलांनी ताब्यात घेतली आहे.
शिवसेना खासदार गजानन किर्तीकर यांनी बाळासाहेबांची शिवसेना पक्षात प्रवेश केला. किर्तीकरांसारखा शिवसेनेसाठी आयुष्य देणारा कार्यकर्ता सोडून जातो व अशा रितीने शिवसेनेच्या मूळ विचारांचे सर्वजण सोडून गेले तरी उद्धव ठाकरे यांना काही फरक पडत नाही. कारण त्यांच्या पाठीशी आता काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस आहे. त्यांनी काँग्रेस पक्षाचे सर्व काही स्वीकारले आहे," असा टोला त्यांनी लगावला.