माझ्या प्रदेशाध्यक्षपदाच्या कार्यकाळात फडणवीस मुख्यमंत्री झाले पाहिजे, बावनकुळेंचे मोठे विधान
राज्यात सध्या प्रचंड राजकीय गदारोळ सुरु आहे. त्यातच सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये रोज नवनवीन विषयावरून जुंपलेली दिसत आहे. तर दुसरीकडे पाठोपाठ वादग्रस्त विधानांचे सत्र राजकीय मंडळींकडून सुरु आहे. हा सर्व गोंधळ सुरु असताना त्याच पार्श्वभूमीवर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी मोठे विधान केले आहे. माझ्या प्रदेशाध्यक्षपदाच्या कार्यकाळात देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री झाले पाहिजे असे ते म्हणाले आहे. या वक्तव्याचे राजकीय पडसाद उमटण्याची तीव्र शक्यता आहे.
काय म्हणाले बावनकुळे?
नागपुरात संत संताजी जगनाडे महाराज यांच्या स्मारक आणि आर्ट गॅलरीचा भूमिपूजन कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी बोलत असताना बावनकुळे म्हणाले की, राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जातीपातीच्या बाहेर निघालेले नेते आहेत. न्यायासाठी आलेल्या प्रत्येकाला त्यांनी मदत केली आहे. जो जो समाज त्यांच्याकडे गेला. त्याच्यासाठी त्यांनी काम केलं आहे. मराठा असतील, धनगर असतील, ओबीसी असतील, सर्वांसाठी त्यांनी काम केलं. माझ्या प्रदेशाध्यक्षपदाच्या कार्यकाळात ते मुख्यमंत्री झाले पाहिजे असे बावनकुळे यावेळी म्हणाले.
पुढे ते म्हणाले की, समाजाला जेव्हा काही द्यायचा प्रश्न आला, तेव्हा देवेंद्र फडणवीस यांनी मागण्या मान्य केल्या. त्यामुळे आपली ही जबाबदारी आहे की पुन्हा एकदा 2014 ते 2019 चा काळ महाराष्ट्रात आला पाहिजे. त्यासाठी आपण सर्व समाजातील लोकांनी देवेंद्र फडणवीस यांच्या मागे उभे राहिले पाहिजे असे आवाहन बावनकुळे यांनी केले. फडणवीस यांनी कधीही आपल्याकडून (समाजाकडून) अपेक्षा व्यक्त केली नाही, की अमक्या समाजाने माझ्यासाठी हे करावं. देवेंद्र फडणवीस यांना फक्त पदावर बसवण्यासाठी नाही तर सर्व समाजाला न्याय मिळण्यासाठी आता आपली जबाबदारी वाढली आहे. असे विधान बावनकुळे यांनी केले.