राज्याची अडीच वर्षे वाया घालवली, रावसाहेब दानवेंचा उद्धव ठाकरेंना टोला
राज्यात सध्या परतीच्या पावसांनी धुमाकूळ घातला आहे. या अतिवृष्टीमुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. त्याच पार्श्वभूमीवर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज औरंगाबाद जिल्ह्यातील नुकसानीची पाहणी केली. त्यावेळी उद्धव ठाकरेंना शेतकऱ्यांनी आसूड दिला, हा आसूड सत्ताधाऱ्यांवर चालवला पाहिजे, असे विधान करत त्यांनी राज्यसरकारवर जोरदार टीका केली. त्यालाच आता भाजप नेते केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी प्रत्युत्तर दिले आहे. 'पहिला आसूड हा उद्धव ठाकरेंवरच चालवला पाहिजे; कारण त्यांनी राज्याची अडीच वर्षे वाया घालवली आहेत’, अशा विखारी शब्दात त्यांनी ठाकरेंना उत्तर दिले आहे.
काय म्हणाले रावसाहेब दानवे?
उद्धव ठाकरेंच्या वक्तव्याला उत्तर देताना दानवे म्हणाले की, ‘पहिला आसूड हा उद्धव ठाकरेंवरच चालवला पाहिजे; कारण त्यांनी राज्याची अडीच वर्षे वाया घालवली आहेत’ उद्धव ठाकरे हे आता बाहेर पडले आहेत. राज्यात काही ठिकाणी ठाकरे दौरे करत आहेत. याचे क्रेडीट त्यांना स्वतःला जात नाही. त्याचे क्रेडीट राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना जात आहे. कारण अडीच वर्षे उद्धव ठाकरे हे ना मंत्रालयात गेले ना राज्यात फिरले. त्यांनी अडीच वर्षे घरी बसून कारभार केला. राजा जोपर्यंत जनतेत जाणार नाही. तोपर्यंत जनतेची दुःखं त्याला कळणार नाही. हे आम्ही त्यांना अनेक वेळा सांगितले, पण ते घराच्या बाहेर पडले नाहीत. आपले कुटुंब आणि आपली जबाबदारी एवढंच काम त्यांनी केले. असे जोरदार प्रत्युत्तर यावेळी दानवेंनी माध्यमांद्वारे ठाकरेंना दिले.
पुढे बोलताना ते म्हणाले की, जेव्हा ४० आमदार एकनाथ शिंदे सोबत गेले, तेव्हा उद्वव ठाकरे यांच्या लक्षात आले की जनतेत गेल्याशिवाय जनसमर्थन मिळत नाही, जसे एकनाथ शिंदेंना मिळाले, त्यामुळे ठाकरे हे आता जनतेत जाण्याचा प्रयत्न करत आहेत. अजून किती ठिकाणी ते जातील, हे सांगता येत नाही. पण ते जनतेत मिसळण्याचा प्रयत्न करत आहेत, हे चांगले लक्षण आहे. एक विरोधी पक्षातील माणूस जनतेत जाऊन लोकांचे प्रश्न समजून घेतो, हे महत्वाचे आहे, असे मत यावेळी दानवेंनी मांडले.