काँग्रेसची भारत जोडो यात्रा महाराष्ट्रात दाखल, मशाल ठरली केंद्रस्थानी
सध्या देशभरात काँग्रेसची 'भारत जोडो यात्रा' सुरु आहे. राहुल गांधींच्या नेत्तृत्वात ही आता महाराष्ट्रात दाखल झाली आहे. आज नांदेडमधील देगलूर या ठिकाणी ही पदयात्रा पोहोचली आहे. यावेळी राहुल गांधी आणि त्यांच्यासोबत असलेल्या हजारो कार्यकर्त्यांच्या हाती मशाली घेतल्या होत्या. त्यांनतर देगलूर नाक्यावर ही मशाल यात्रा आल्यानंतर राहुल गांधी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला अभिवादन केले.
यावेळी राहुल गांधी यांना पाहण्यासाठी सामान्य नागरिकांसह कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांचा मोठा उत्साह पाहायला मिळाला. बॅनर, झेंडे आणि राहुल गांधी यांची प्रतिमा हाती घेत नागरिकांनी यात्रेला हजेरी लावली. यात्रेच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी कडक बंदोबस्त ठेवला होता.
राज्यातील नांदेड, हिंगोली, वाशीम,अकोला आणि बुलढाणा या पाच जिल्ह्यातून 14 दिवस ही यात्रा तब्बल 384 किलोमीटरचा प्रवास करणार आहे. अकोला जिल्ह्यातील यात्रा मार्गांवर राहुल गांधी कारने प्रवास करणार आहेत. काँग्रेसच्या या यात्रेत अनेक सामाजिक संघटना सहभागी होणार आहेत.