संजय राऊतांचं नाणं आता जुनं झालंयं, ते काही आता...; भरत गोगावलेंचा निशाणा
नागपूर : हिवाळी अधिवेशनात शिवसेना आमदार आदित्य ठाकरेंना सत्ताधाऱ्यांनी लक्ष्य केल्यानंतर ठाकरे गट चांगलाच आक्रमक झाला आहे. शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे स्वतः सभागृहात दाखल झाले आहेत. यावेळी शिवसेना खासदार संजय राऊत नागपुरात मोठा गौप्यस्फोट करणार असल्याचे सांगितले आहे. या पार्श्वभूमीवर शिंदे गटाचे नेते भरत गोगावले यांनी संजय राऊतांवर निशाणा साधला आहे. संजय राऊत यांचं नाणं आता जुनं झालं आहे, असा चिमटा त्यांनी राऊतांना काढला आहे.
भरत गोगावले म्हणाले, संजय राऊत यांचे नाणे आता जुने झाले आहे. ते आता काही वाजणार नाही. त्यांनी काहीही गौप्यस्फोट केला तरी आम्ही तयार आहोत. आमची टीम तयार आहे. आम्ही त्यांना प्रत्युत्तर देऊ, असे त्यांनी म्हंटले आहे.
तर, ऐन अधिवेशनात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिल्लीवारी करणार आहेत. यावरुन विरोधकांनी सडकून टीका केली आहे. यालाही भरत गोगावलेंनी प्रत्युत्तर दिले आहे. दिल्लीला जाणे म्हणजे झुकायला जाणे असते काय? ते (भास्कर जाधव) उद्धव ठाकरे यांच्यापुढे मुजरा करतात ते काय दिसत नाही का, अशा शब्दात त्यांनी विरोधकांना सुनावले आहे. मुख्यमंत्री दिल्लीत महाराष्ट्राच्या हिताचे प्रश्न मार्गी लावायला जातात, असे त्यांनी सांगितले आहे.
ठाकरे गट व शिंदे गट एकाच हॉटेलमध्ये असलो तरी आम्ही आता वेगळे झालो आहोत. एका हॉटेलमध्ये, विमानात आलो म्हणजे काही होत नाही. जय महाराष्ट्र मात्र करू, असेही त्यांनी म्हंटले आहे
दरम्यान, नागपूरमध्ये उध्दव ठाकरे आणि मी बरेच बॅाम्ब फोडणार आहोत. आम्ही पाठीत खंजीर खुपसणारे नाही, आमची सेना लेचापेचा, पळपुट्यांची नाही. धमक्या द्या, तडीपारी करा तरीही आमची सेना बुलंद आहे. अली बाबा चाळीस चोर फेब्रुवारीनंतर नसणार, असा सूचक इशारा देखील संजय राऊत यांनी दिला होता.