लाडक्या बहिणींनो, बँक खाते तपासा! तीन हजार रुपये जमा होण्यास सुरुवात
सुरेश वायभट | पैठण: मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज भरलेल्या महिलांच्या बँक खात्यावर एकाच वेळी तीन हजार रुपये जमा होण्यास सुरुवात झाली आहे. महिलांच्या मोबाईलवर सदरील योजनेचा तीन हजार रुपये जमा झाल्याचा मेसेज आल्याचे पाहून महिलांच्या चेहऱ्यावर आनंद पाहायला मिळाला.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रक्षाबंधनापूर्वीच महिलांना ओवाळणी भेट दिल्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सरपंच स्वाती किशोर काळे यांनी आभार मानले. पैठण तालुक्यात अनेक महिलांच्या मोबाईलवर सदरील योजनेचा तीन हजार रुपये जमा झाले आहे. तालुक्यात उर्वरीत महिलांना पुढील काही दिवसांत हा पहिला हप्ता मिळू शकतो. यासाठी आधार बँक खात्याशी लिंक असणे आवश्यक आहे.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभाचे वितरणाला सुरुवात झाली असुन लाभार्थी महिलांना आधार जोडणी केलेल्या त्यांच्या बँक खात्यात थेट लाभ मिळणार आहे. ज्या पात्र महिलांच्या बँक खात्याशी आधार जोडणी झालेली नाही, अशा पात्र लाभार्थी महिलांनी आधार जोडणी करावी.