मंत्र्यांनी भान ठेवून बोलावं, धनंजय मुंडेंनी सावंतांना फटकारले
राज्यात सध्या प्रचंड राजकीय चिखलफेक सुरु आहे. अशातच शिंदे-फडणवीस सरकारमधील आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी मराठा आरक्षणाबाबत वादग्रस्त विधान करत, नवा वाद सुरु केला आहे. तात्काळ त्यानंतर मंत्री सावंत यांनी माफी मागितली तरी मात्र, अद्यापही त्यांच्यावर विरोधकांचा प्रहार सुरु आहे. त्याच विधानावर आता राष्ट्रवादी आमदार धनंजय मुंडे यांनी सावंत यांना फटकारलं आहे.
काय म्हणाले धनंजय मुंडे?
बीडमध्ये माध्यमांशी बोलत असताना मुंडे म्हणाले की, कुठल्याही लोकशाही मध्ये मंत्र्यांनी किंवा मंत्र्याच्या विरोधात असलेल्या सदस्यांनी काय टीका करावी, हे महत्वाचं नाही. पण मंत्रीपदावर आल्यावर मराठा आरक्षणाच्या बाबतीत मंत्री तानाजी सावंत बोलले, तोच समाज त्यांचे मंत्रीपद कायमचं काढून घेऊ शकते, एक मात्र नक्की आहे. सत्तेत आलं की मराठा क्रांती मोर्चाबद्दल बोलायचे. त्यांचा अपमान करायचा. कोणीही ताम्रपत्र घेऊन जन्माला आले नाही. बोलताना त्यांनी भान ठेवून बोलावं. असा सल्ला मुंडे सावंत यांना केला आहे.
काय म्हणाले होते तानाजी सावंत?
आम्हाला ओबीसीमधून आरक्षण पाहिजे, आम्हाला एसटीमधून आरक्षण पाहिजे अशा मागण्या होत आहेत. अहो हे कोण आहेत? याच्या मागचा करता करविता कोण आहे? हे तुम्हा-आम्हाला माहित असणं गरजेचं आहे. हे सर्वांना माहिती आहे फक्त कुणी बोलत नाही. तुम्हाला मराठा आरक्षणाची खाज सत्तांतरण झाल्यानंतर सुटली, असे वक्तव्य तानाजी सावंत यांनी एका कार्यक्रमात केले होते.