लोकसभेच्या 48 पैकी 40 जागा महाविकास आघाडी जिंकणार : बाळासाहेब थोरात
विकास वाकळे | संगमनेर : महाराष्ट्रातील लोकसभेच्या 48 जागांपैकी 40 जागा महाविकास आघाडीच्या येतील, असा विश्वास माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केला आहे. निळवंडे धरणाचे पाणी संगमनेर तालुकात पोचल्या नंतर माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते निळवंडे गावात पाण्याचे विधीवत पूजन करण्यात आले. यावेळी ते पत्रकारांशी संवाद साधत होते.
कर्नाटकच्या विजयानंतर मोठा उठाव सोशल मीडियावर होतो आहे. संगमनेर तालुका अशांत कसा होईल याकडे काही लोक लक्ष देत असल्याचा दावाही थोरात यांनी केला आहे. महाविकास आघाडीमध्ये जो ज्या जागेवर ताकदवान आहे तिथे त्यांना ताकद देणे, कोणाचं खच्चीकरण न करणे हा शरद पवार यांचा सल्ला योग्य असल्याचेही थोरातांनी स्पष्ट केले.
काही दिवसांपूर्वी निळवंडे धरणातून पाणी सोडण्याच्या चाचणीचे उद्घाटन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले होते. हे पाणी संगमनेरातील दुष्काळी भागात पोहचल्यावर तळेगाव दिघे गटातील लोकांनी एकच जल्लोष केला. या लोकांच्या आनंदात संगमनेर तालुक्याचे बाळासाहेब थोरात सहभागी झाले.