महापुरुषांबद्दल वाईट बोलत असेल तर रट्टा दिला पाहिजे : बच्चू कडूंचा घरचा आहेर
सूरज दहाट | अमरावती : राज्यपाल भगतसिंग कोश्यारींसह भाजपच्या नेत्यांनी महापुरुषांबद्दल वादग्रस्त वक्तव्य केल्याने राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. याविरोधात उद्या मुंबईत महाविकास आघाडीचा भव्य मोर्चा आहे. या पार्श्वभूमीवर शिंदे गटाचे आमदार बच्चू कडू यांनी प्रतिक्रिया दिली. ते अमरावतीत माध्यमांशी बोलत होते.
महापुरुषांबद्दल वक्तव्य करणाऱ्या विरोधात मोर्चा काढत असेल तर ते चांगलंच आहे. तसेच महापुरुषांबद्दल कोणी वाईट बोलत असेल तर त्याला रट्टा दिला पाहिजे, अस ठाम मत बच्चू कडू यांनी व्यक्त केलं. राज्यपालांनी महापुरुषांबद्दल असं पुन्हा पुन्हा बोलू नये तर कोणत्याही पक्षाच्या नेत्यानी सांभाळून महापुरुषाबद्दल बोलले पाहिजे. उद्याचा महाविकास आघाडीचा मोर्चा ऐतिहासिक आहे, असं म्हणत बच्चू कडू यांनी महाविकास आघाडीच्या मोर्चाला समर्थनच दिलेले आहे
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म महाराष्ट्रात झाला, असं वक्तव्य ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केलं होतं. यावर आता राजकारण तापलं आहे. यावरही बच्चू कडू यांनी प्रतिक्रिया दिली आहे. संजय राऊत खूप पत्रकार परिषद घेतात. पत्रकारही त्यांना खूप प्रश्न विचारतात. त्यांनी आता चूक दुरुस्ती केली पाहिजे व माफी मागितली पाहिजे. तसेच, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म मध्यप्रदेशच्या महू गावात झाला. त्या गावात सुद्धा त्यांनी जाऊन आले पाहिजे, असा सल्ला कडूंनी संजय राऊतांना दिला आहे.
दरम्यान, महापुरुषांचा वारंवार होणाऱ्या अवमानाविरोधात महाविकास आघाडीने शनिवारी 17 डिसेंबर रोजी महामोर्चाचं आयोजन केलं आहे. या मोर्च्याला पोलिसांनी आता परवानगी दिली आहे. हा मोर्चा यशस्वी करण्यासाठी शिवसेना आणि काँग्रेसप्रमाणेच राष्ट्रवादीनेही कंबर कसली आहे. तर, संजय राऊतांविरोधात भाजप उद्याच माफी मांगो आंदोलन करणार असल्याची घोषणा आशिष शेलारांनी केली आहे.