हो, आम्ही गद्दार आहोत पण... : बच्चू कडू
सुरज दाहाट | अमरावती : उद्धव ठाकरेंना सोडून शिंदे गटात गेलेल्या आमदारांवर विरोधक गद्दार गद्दार अशी टीका करतात. तर दोन दिवसांपूर्वी बच्चू कडू यांना नाशिकमध्ये काही लोकांनी अडवून गद्दार असं म्हंटल होतं. त्यावर बच्चू कडू यांनी अमरावती जिल्ह्यातील तिवसा येथील ठाकरे गटाने आयोजित केलेल्या शिवजयंतीच्या कार्यक्रमात 'गद्दार'वर स्पष्टीकरण दिलं.
काही लोकं आम्हाला गद्दार म्हणतात. आम्ही गद्दार आहोत. पण नेत्यांचे गद्दार आहे, जनतेचे गद्दार आम्ही कधी होणार नाही, असं विधान बच्चू कडू यांनी केलं आहे. तर नेत्यांची गुलामगिरी करणारा बच्चू कडू नाही, असंही त्यांनी यावेळी ठासून सांगितले. निष्ठा नेत्यांवर, पक्षावर व माझ्यावरही ठेवू नका तर निष्ठा देशावर आपल्या बापावर ठेवा. झेंडा बदलला की तुम्ही बदलून जाता हे होता कामा नये, असंही बच्चू कडू म्हणाले आहेत.
दरम्यान, धाराशिव येथे बच्चू कडू हे कोर्टाच्या कामानिमित्त आले असता एका ज्येष्ठ शेतकऱ्यांनी बच्चू कडू यांची गाडी अडवली. व महाराष्ट्राला जनतेला का त्रास देत आहात? गद्दारी केली. हा गद्दारीचा बाप आहे, अशा शब्दात त्यांनी थेट जाब विचारला होता. तर, नाशिकच्या निफाडमध्ये बच्चू कडू हे कांदा उत्पादक शेतकऱ्यांची भेट घेण्यासाठी गेले होते. यावेळीही तुम्ही शेतकऱ्यांचे कैवारी आहात, मात्र गद्दारांसोबत जायला नको होते, अस शेतकऱ्यांनी बच्चू कडू यांना म्हटले होते.