बावनकुळेंकडून जागा वाटप जाहीर! बच्चू कडूंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, युती नाही..
अमरावती : भाजपाच्या निवडणुकीच्या जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरला आहे. भाजप 288 पैकी 240 जागा लढवणार असल्याचं चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितलं. त्यामुळे शिंदे गटाला केवळ विधानसभेच्या केवळ 48 जागाच मिळणार असल्याचं दिसून येत आहे. यामुळे सत्ताधारी भाजपमध्ये आणि शिवसेनेत आता मतभेद होण्यास सुरुवात झाली आहे. यावर अपक्ष आमदार बच्चू कडू यांनी प्रतिक्रिया दिली आहे. पुढील निवडणूकीत एकनाथ शिंदे सोबत युती करायची की नाही ते आता ठरलं नाही, असे सूचक विधान त्यांनी केले आहे.
आमची प्रहार संघटना असून आता शिंदे सरकारला पाठिंबा दिला आहे. आगमी विधानसभा निवडणुकीत युती करायची की नाही हे अजून ठरलं नाही. तर चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलेले वक्तव्य अधिकृत की अनधिकृत की चुकून त्यांच्या तोंडून शब्द निघाला हे तपासलं पाहिजे. दीड वर्षात पुढे काय होते ते आता सांगता येणार नाही. कारण या पाच वर्षात तीन मुख्यमंत्री बदलले. अजून दीड वर्षात यात काही चेंज सुद्धा होऊ शकते, असं विधान बच्चू कडू यांनी केलं आहे.
दरम्यान, बावनकुळेंच्या विधानावर शिवसेनेकडून संतप्त प्रतिक्रिया आल्या आहेत. त्यांनी केलेल्या वक्तव्यात काहीही दम नाही. बावनकुळे यांना एवढे कोणी अधिकार दिलेले नाहीत. अशाप्रकारे बोलल्यामुळे युतीमध्ये बेबनाव येतो. याची जाणीव त्यांनी ठेवली पाहिजे, आम्ही काही मूर्ख आहोत का, असा सवाल संजय शिरसाट यांनी विचारला आहे. तर, संजय गायकवाड यांनी आम्ही 130 त्यापेक्षा कमी जागा लढणार नाही. अशा प्रकारची वक्तव्ये केल्याप्रकरणी पक्षश्रेष्ठींनी त्यांना समज द्यावी. असा सल्ला त्यांनी भाजपाला दिला.